परराज्यातून आलेले दीडशेहून अधिक नागरिक नगरमध्ये अडकले

परराज्यातून येणाऱ्यांची संख्या सर्वत्र झपाट्याने वाढत चालली असताना नगर शहरामध्ये सुमारे 150 नागरिकांना येथील प्रशासनाने रोखून धरले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला इतर जाता येणार नाही, असे स्पष्ट आदेश देऊन त्यांची राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील राहुल द्विवेदी यांनी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात समस्या आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपजिल्हाधिकारी अजय मोरे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. विरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद करण्यात आलेले आहे. सर्वत्र जिल्हाबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे. परराज्यातून सुद्धा येण्यामुळे बंदी घालण्यात आलेली आहे. या कायद्याचं उल्लंघन करून अनेक जण आता महाराष्ट्रामध्ये येऊ लागलेले आहेत. शुक्रवारी नगर जिल्ह्यामध्ये आंध्र कर्नाटक आदी भागातून सुमारे 56 आले होते. त्यांच्या जवळ चार ते पाच मोठ्या गाड्या होत्या. जिल्हा प्रशासनाने त्यांची माहिती घेतल्यानंतर हे इतर राज्यातून आले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले व त्यांच्यावर येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये राजस्थान येथून 71, बिहार 15, कर्नाटक 20 उत्तर प्रदेश 39 असे एकूण नगर शहरामध्ये 145 आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्यांच्या गावाकडे व इतर जाण्यास बंदी केल्यामुळे त्यांना एक स्वतंत्र जागा दिली आहे. त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व जेवणाची सोय सुद्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

परराज्यातून जिल्ह्यातून आलेल्यांचे शोधमोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी पोलिसांमार्फत विशेष पथक नेमून त्याची माहिती घेतली जात आहे. महापालिकेला या संदर्भातील सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासनाने जिल्हा बंदीचे आदेश दिलेले आहेत. जो कुणी नियमाचे उल्लंघन करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच नगर शहरातील नागरिक तालुक्यांमध्ये अथवा जिल्हाभर अडकलेल्या असतील त्यांनी त्याच ठिकाणी थांबावे, अशा सूचना दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. राज्यातली लोकांची संख्या विचारात घेता, जागा पुरली नाही तर एखादी शाळा सुद्धा यासाठी घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आता तपासणीवर लोकांचा भर
अनेक जणांचे वैद्यकीय रिपोर्ट हे इतर जिल्ह्यांमध्ये अथवा राज्याबाहेर असतात. त्यांना तेथील डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत, अशी माहिती घेऊन अनेक जण जिल्हा प्रशासनाकडे येत आहे. या संदर्भामध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांनी एखाद्याला पत्र देताना त्या रुग्णाची अथवा त्यांच्या नातेवाईकांची सर्व खात्री केल्याशिवाय देऊ नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

सुशिक्षित लोकांचे आपत्ती व्यवस्थापनात फोन
आपत्ती व्यवस्थापनामध्ये ज्या लोकांना तक्रारी करायच्या असतील किंवा काही सूचना करायची असेल, त्यासाठी जिल्हा प्रशासन वतीने स्वतंत्र कक्ष उघडण्यात आलेला आहे. या कक्षामध्ये लोकांनी तक्रारीचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी लेखी स्वरूपामध्ये सुद्धा तक्रारी दाखल केलेल्या आहेत. याची संख्या पाहता ती 125 च्या घरांमध्ये गेलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या