
>> नमिता वारणकर
सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा संतांचे चरित्र नेहमीच वाखाणण्याजोगे, वैशिष्ट्यूपर्ण आणि ईश्वरी लीलांनी भरलेले असते. ‘मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर !’ , अशी जगाला स्वत:ची ओळख करून देणारे ‘शंकर महाराज’. अष्टावक्र, अजानुबाहू, बहुरुपी, भक्तांना संकटमुक्त करण्याचा ध्यास असलेले, ज्ञानमार्ग दाखवणारे, नाठाळांचे कर्दनकाळ, विश्वभर संचार करणारे … महाराजांमध्ये असलेली अनोखी शारीरिक वैशिष्ट्ये, विलक्षण योगसामर्थ्य, त्यांनी केलेल्या अनाकलनीय गूढ लीला ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेद्वारे रसिकांना पाहायला मिळत आहेत. एखाद्या अवलीयाची आगळीवेगळी व्यक्तिरेखा साकारण्याकरिता घ्यावी लागणारी मेहनत, आलेले विलक्षण अनुभव याविषयी जाणून घेण्याकरिता अभिनेता संग्राम समेळ आणि मालिकेचे लेखक बाळकृष्ण तिडके यांची घेतलेली ही मुलाखत –
भक्तिच्या वाटा जगाला दाखवण्यासाठीच संत पृथ्वीवर जन्म घेतात. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक संतांपैकी एक म्हणजे नाशिक जिल्ह्यातील ‘शंकर महाराज’. त्यांनी केलेल्या अनाकलनीय आणि गूढ लीलांची महती वर्णावी तेवढी थोडीच ! त्यांची अलौकिक भूमिका साकारण्याची संधी मालिकेच्या माध्यमातून मिळण्याविषयी अभिनेता संग्राम समेळ म्हणाले, जेव्हा शंकर महाराजांची भूमिका साकारण्याकरिता ऑडिशन झाल्या तेव्हा त्यात माझी निवड झाली. हे सांगायला आनंद होतो. महाराजांची कृपा अशी की, महाराजांसारखा पेहराव, केशभूषा, वेशभूषा ही माझा चेहरा आणि शरीरयष्टीला तंतोतंत जुळत होती. त्यामुळे प्रोडक्शन टिम आणि वाहिनीकडून या भूमिकेकरिता माझी निवड झाली. शिवाय ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना त्यांचे वंशज हयात असतील तर त्यांचं म्हणणंसुद्धा लक्षात घेणं गरजेचं असतं. या व्यक्तिरेखेच्या बाबतीतही हा सगळा विचार आणि चर्चा करून निर्णय घेण्यात आला आणि दुसरं म्हणजे ही भूमिका मिळावी, हे माझ्या नशिबातही होतं.
शिवाचे वैराग्य संपन्न अंशावतार ‘शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’ अशा नावानीही ते ओळखले जातात. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘अष्टावक्र’ असाही केलेला आढळतो. सातपुड्यात ‘सुपड्या बाबा’, खानदेशात ‘कुर्वास्वामी’, वाघोदमध्ये ‘गौरीशंकर’, मध्य प्रदेशात ‘लाहिरी बाबा’, गुजरातमध्ये देवियाबाबा, इस्लाममध्ये रहिमबाबा, आफ्रिकेत ‘टोबो’, तर अरबस्थानात ‘नूर महंमदखान’, मध्य हिंदुस्थानात ‘लहरीबाबा’, दक्षिणेत ‘गुरुदेव’, अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानीत. शिवाय परदेशात पण ते प्रसिद्ध आहेत. जपानमध्ये महाराजांचे असंख्य भक्त आहेत. त्यांचे डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते, त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धत. ‘हे असे रूप!’ वेगळ्या अर्थाने ‘बहुरूपी!’ श्री शंकर महाराजांनी मोठमोठी व्याख्याने, प्रवचने केली नाहीत. एखाद्या ग्रंथावर टीका लिहिली नाही. अष्टावक्र व आजानुबाहू स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळजवळ सर्वच भाषांवर प्रभुत्व होते. आलेल्या भक्ताच्या मायबोलीत ते त्याला उत्तर देत. त्यांचे हे प्रभुत्व फक्त हिंदुस्थानी भाषेवरच नाही, तर परदेशी भाषांवरही होते. आलेल्या रशियन दांपत्याशी महाराजांनी अस्खलीत रशियन भाषेत संवाद साधला होता.
त्यांच्यातील दैवी गुणांमुळेच संतांचं व्यक्तिमत्त्व नेहमीच सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळं असतं. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारण्याकरिता कशी मेहनत घेतलीत असे विचारता ते सांगतात, लेखक बाळकृष्ण तिडके ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेचे लेखन करतात. त्यांचा शंकर महाराजांच्या चरित्राचा खूप अभ्यास आहे. त्यांनी माझी कार्यशाळा घेतली. त्यामध्ये महाराजांसारखा वेश करून सतत फिरणं, त्यांच्याप्रमाणे देहबोली, हावभाव करत दिवसभर वावरणं, ते चिडले तर कसे वागतील, यामध्ये कमी-जास्त प्रमाण असले, तर कसे बोलतील? तर काही वेळा ते खूप खूश आहेत. कमी खूश आहेत, काही वेळा आनंदविभोर होऊन नाचतायत, याशिवाय महाराज झोपतील कसे, बघतील कसे, कोणाकडे काही मागतील कसे, त्यांच्या डोळ्यांचे हावभाव, त्यांच्यासारखं चालणं, सर्वत्र वावरणं, हातवारे करणं, मग्न राहाणं, डोळ्यांत भेदकपणा येण्यासाठी काय काय करायला हवं. त्यांच्या स्वभावातलं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे महाराज एखाद्या व्यक्तिकडे बघायचे तेव्हा त्याचा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ, असं त्याचं अख्खं आयुष्य बघायचे तसेच उन्मनी अवस्थेत ते कसे वागतील, त्याचप्रमाणे काही वेळा ते एका ठिकाणी राहून दुसरीकडे कोणाची तरी अडचण सोडवायचे, असा बारीकसारीक मुद्द्यांचा विचार करून 10 दिवस कार्यशाळा घेण्यात आली. त्यांच्या स्वभावातल्या बारकाव्यांवर काम केलं. नाटकाच्या तालमीप्रमाणे सगळा सराव केला.
व्यक्तिरेखा साकारण्याकरिता घ्यावी लागणारी मेहनत आव्हानात्मक होतीच तितकीच मजेदारही होती, एखाद्या अवलीयाची भूमिका साकारणं जिच्यामध्ये प्रेक्षक आपल्यात तो सत्पुरुष बघणार आहेत शिवाय याआधी लहान शंकर महाराज मालिकेत होते. आता त्यांच्या जागी मला त्यांचा पुढचा प्रवास साकारायचा आहे. ही एक जबाबदारी होती की, प्रेक्षकांच्या मनातली इमेज बाजूला ठेवून त्यांनी मला स्वीकारावं, एवढ्या ताकदीची भूमिका व्हायला हवी. त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांच्या मनातली इमेज बाजूला ठेवून मला स्वीकारावं, असं मत ते व्यक्त करतात.
हिंदुस्थानात भ्रमण करताना त्यांनी आपल्या भक्तांना अवतारकार्याचे स्वरूप दाखवले. प्रेक्षकांकडून दररोज 20 ते 25 मेसेजेस इन्स्टाग्रामवर असतात. फेसबुकवर येतात. नाशिकमध्ये चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे महाराजांचे काही भक्तही मला भेटायला येतात. आपल्या महाराजांवर मालिका सुरू आहे त्यामुळे भक्तांना आनंद होतो. त्यांचे काही भक्त मला भेटून रडायला लागतात. ही महाराजांची कृपा आहे. आपलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय याची ही पावती आहे. लोकांची सेवा करा, हेच सगळ्या संतांचं ध्येय होतं. आपल्या रोजच्या कारभारात आपली तशी इच्छा असते, पण रोजच्या कामाच्या व्यापात अशी कृती आपल्याकडून घडतेच, असे नाही. नित्यनियमाने ठरवलं की, कुत्र्याला पाणी पाजावं, कोणाचं तरी 2 मिनिट काम केलं तरी माणसाला आनंद मिळतो. यामुळे नकळत मिळणारे आशीर्वाद मोलाचे असतात. संतांनी प्रत्येक वेळी चमत्कार केलेले नाहीत, मात्र त्यांनी लोकांच्या अडचणी सोडवल्या, त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांना मदत केली. माणूस म्हणून लोकांसाठी मला हे करता आलं, तर ते माझ्यासाठी खूप असेल, हेच या मालिकेतून शिकायला मिळत असल्याची भावना अभिनेता संग्राम समेळ यांनी व्यक्त केली.
मोठ्या शंकर महाराजांना घडवताना काय विशेष मेहनत घ्यावी लागली, या प्रश्नाचे उत्तर देताना मालिकेचे लेखक बाळकृष्ण तिडके म्हणाले की, महाराजांना साकारणं वाटतं तितकं सोपं नाही, मात्र एखादा अवलिया साकारण्यासाठी कलाकाराची भक्ती, भूमिका साकारण्याची ओढ, त्यासाठी घेतलेले परिश्रम आणि मुख्य म्हणजे त्याची वैचारिक प्रगल्भताही महत्त्वाची असते. एखाद्या सत्पुरुषाची व्यक्तिरेखा साकारण्याकरिता त्यांचा मनातून भक्त होणं आणि त्यांना मनापासून गुरु मानणंही महत्त्वाचं असतं. यामुळेच कलाकाराची काम करण्याची इच्छाशक्ती ही कुठल्याही भक्ताला त्याच्या गुरुपर्यंत नक्कीच घेऊन जाते. संग्रामने महाराजांची जीवनयात्रा प्रेक्षकांना घडवण्यासाठी या सगळ्या गोष्टी पणाला लावल्या आहेत.
महाराजांकडून सकारात्मकतेचा अंश मिळाला…
मालिका आणि चित्रपटातही आपण काम केलं आहे, पण महाराजांचं व्यक्तिमत्त्व साकारणं, हा तुमच्यासाठी दिव्य अनभव आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात, मी थोडा आध्यात्मिक आहे. फार देवावर विश्वास आहे, असं नाही; मात्र एक शक्ती आहे, जी सगळ्या जगाचा कारभार पाहते, त्या शक्तीला मनापासून नमस्कार करत आलो आहे. याआधी नाटकात मी विवेकानंद साकारले होते. विवेकानंदांना त्यांच्या गुरुंचा म्हणजे रामकृष्ण परमहंस यांचा ध्यास लागणं, त्यांच्याकडून दीक्षा मिळणं, यामुळे माणसात होणारा बदल ही आध्यात्मिक वाटचाल नाटकाच्या निमित्ताने साकारली आहे. अगदी तंतोतंत हाच भाग या मालिकेत आहे. स्वामी समर्थ शंकर महाराजांचे गुरु आहेत. त्यांचा त्यांना ध्यास लागणं, त्यांच्याकडून दीक्षा मिळणं. दीक्षा मिळाल्यानंतर येणारी प्रगल्भता आणि त्यानंतर त्यांच्या मानवी शरीरात होणारे बदल. याकरिता महाराजांचं शरीर नेहमीपेक्षा जास्त वाकलेलं, अष्टवक्र दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. जे लहानपणी नव्हतं, पण आता हात वाकडा आहे. पाय वाकडा झालाय. मान वाकलेली असते. हे मानवी शरीराला दैवी शक्तींचं वजन न पेलण्याचं लक्षण आहे. याचे कारण म्हणजे महाराजांनी 21 वर्षे तपश्चर्या केली आहे. त्यांच्या साधनेचा फक्त विचार केला, तरी अंगावर काटा येतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेवर काम करत असताना एक अभिनेता म्हणून मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी त्यांच्यात असलेली प्रचंड सकारात्मकता जाणवतेच. मालिकेत काम करताना आलेला दिव्य अनुभव म्हणजे बरेच तास शुटिंग करूनही थकवा जाणवत नाही. प्रत्येक वेळी चित्रीकरण करताना भरभरून उत्साह आणि वेगळंच चैतन्य जाणवतं. उत्साह कधीही कमी होत नाही. कदाचित मला असं वाटतं की, त्यांच्यातील सकारात्मकतेचा अंश आपल्याला मिळालाय.
अविस्मरणीय अनुभव !
शंकर महाराज यांचे अनाकलनीय व्यक्तिमत्त्व साकारताना सकारात्मक झालो. सगळ्या गोष्टिंकडे बघण्याचा दृष्टिकोन अनपेक्षितपणे बदलला. स्वत:ला कसलाही त्रास करून घेत नाही. अशा अनेक गोष्टी उदा. सेटवर हे मिळालं नाही. ते मिळालं नाही की, छोट्या छोट्या गोष्टींचा जो बाऊ आपण करतो, त्रागा करतो किंवा दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही…असे नकारात्मक विचार आता मनात येत नाहीत. मी अलिप्त झालोय या सगळ्यापासून असं वाटतंय. दररोज तेवढ्याच एनर्जीने सेटवर येतो. शूट करतो. एखादी गोष्ट स्वीकारण्याची माझी वृत्ती वाढलीय. परिस्थितीचा स्वीकार करायला शिकलोय. अजून एक मोठा बदल म्हणजे दररोज मांसाहार करणारा माणूस आहे, पण जेव्हापासून मालिकेचं चित्रीकरण सुरू झालंय तेव्हापासून मांसाहार करण्याची इच्छाच गेली आहे. एकही दिवस अंडही खाल्लं नाही. इच्छाच होत नाही. त्यामुळे माझ्यात संयमही आलाय असं वाटतंय. हे सगळं प्रयत्न न करता आपोआप घडून आलं. मालिका करताना स्वत:हून करत नसलो, तरी भूमिका करण्याच्या निमित्ताने 50 वेळा महाराजांचं नाव घेत असेन. त्यामुळे माझ्याकडून नकळत नाम होतंय. लोकं मला भेटतात. मला ‘जय शंकर’ म्हणतात मीही त्यांना ‘जय शंकर’ म्हणतो. या मालिकेमुळे छान नाम तोंडातून बाहेर पडतं. हा कलाकार म्हणून अविस्मरणीय अनुभव आहे, अशी माहिती अभिनेता संग्राम समेळ यांनी व्यक्ती किंवा अभिनेता म्हणून मालिकेमुळे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात घडलेल्या बदलांविषयी दिली.
करियरमधला मैलाचा दगड !
भक्तांना संकटमुक्त करणारा तपस्वी ‘या’ व्यक्तिरेखेच्या माध्यमातून साकारण्याची संधी मिळणं म्हणजे कलाकाराने त्याच्या कलेतला मैलाचा दगडं गाठणं, असं तुम्हाला वाटतं का, या प्रश्नाचे उत्तर देताना संग्राम म्हणतात, हो नक्कीच वाटतं; कारण याआधी राजाराम महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर आता शंकर महाराज साकारतोय. ही भूमिका नक्कीच कलेतील मैलाचा दगड ठरतात; कारण लोकांकडून प्रतिक्रिया येतेय आता की, आम्ही महाराजांना कधी पाहिलं नाही, पण तुम्हाला बघितल्यावर वाटतं; महाराज असेच असतील. लोकं जेव्हा एखाद्या पात्राशी मुख्य म्हणजे अशी आव्हानात्मक भूमिका कलाकारासाठी त्याच्या करियरमधील वाटचालीत मैलाचा दगडच असते. भूमिका साकारणाऱ्या कलाकारामध्ये त्या तपस्व्याचे दर्शन लोकांना घडत असते.
मालिकेचं लेखन म्हणजेच सेवाभाव – लेखक बाळकृष्ण तिडके
शंकर महाराजारांच्या चरित्रावर आधारित मालिका लिहिण्याची स्फूर्ती कशी मिळाली तसेच महाराजांची भूमिका कलाकाराकडून प्रत्यक्ष करवून घेणं, या प्रवासात तुम्ही काय अनुभवत आहात, याविषयी मालिकेचे लेखक बाळकृष्ण तिडके सांगतात, मी स्वामी समर्थ आणि शंकर महाराज यांचा भक्त आहे. सेवाभाव म्हणून मालिकेचे लेखन करत आहे. रंगकर्मी म्हणून गेल्या 22 वर्षांपासून नाटकात काम करत होतो. माझ्या गुरुंच्या मार्गदर्शनामुळे मी ‘शंकर महाराज’ यांच्याविषयी ‘मी पाहिलेला अवलिया’ हे नाटक लिहिलं, दिग्दर्शित केलं होतं. या नटकाचे काही प्रयोग महाराष्ट्रभरात तसेच वृद्धाश्रमातही केले. शंकर महाराजांवर माझ्या गुरुंच्या मार्गदर्शनानुसार 12 वर्षांपासून अभ्यास आणि साधना करत आहे. महाराजांचा 150 वर्षांचा कार्यकाळ आहे. त्यांच्या सेवेत असल्यामुळे त्यांनी केलेले चमत्कार, लोकांना आलेले दिव्य अनुभव अभ्यासत होतो. महाराजांनीच मालिकेचं लिखाण माझ्याकडून करवून घेतलं, असं वाटतं. त्यानंतर महाराजांविषयी केलेलं लिखाणं कलर्स मराठी वाहिनीकडे सादर केलं. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद आला आणि मालिका सुरू झाली. या सगळ्या प्रक्रियेसाठी 2 वर्षांचा कालावधी लागला. महाराजांचा आध्यात्मिक प्रवास खूपच भारावून टाकणारा आहे. महाराजांनी केलेल्या चमत्कारामागे तत्त्वज्ञान काय सांगितलं आहे, हे शोधण्याचा या मालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांचे अनेक भक्तही आहेत. यापेक्षा समाजाला आपण काय देऊ शकतो. या विचारातून मालिका लेखनाची प्रेरणा मिळाली. धनकवडी मठ, माझे गुरु जगताप बाबा, महाराजांचा भक्त समुदाय यांच्या सहकार्यातून महाराजांचं रूप प्रेक्षकांसमोर उभं राहात आहे.























































