लघुपटामुळे लागली ‘माधुरी’ची लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

संहिता जोशी हा फ्रेश चेहरा आगामी ‘माधुरी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संहिताची आई म्हणजेच स्वप्ना वाघमारे-जोशी या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहे. माधुरी या सिनेमात ती काव्या नावाच्या आजच्या तरुणीची भूमिका साकारत असून सिनेमासाठी तिने तब्बल 25 किलो वजन घटवले आहे. संहिताशी केलेली बातचीत…

‘माधुरी’मधील भूमिकेविषयी काय सांगशील?
– या सिनेमात माझ्या भूमिकेचे नाव काव्या आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या मुलीची भूमिका मी साकारली आहे. काव्या ही आजच्या मुलीचे प्रतिनिधित्व करते. अत्यंत बिनधास्त, स्वतःचे निर्णय स्वतःच घेणारी ती मुलगी आहे. तिचे आईवर खूप प्रेम आहे, पण ते दाखवण्याची तिची तयारी नाही. पुढे तिच्या आयुष्यात काय घडते हे या सिनेमात पाहायला मिळेल.

तुझी आई स्वप्ना वाघमारे-जोशी या सिनेमाच्या दिग्दर्शिका आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
– खरं सांगायचे तर सेटवर मी आईसोबत काम करतेय असे मला कुठेही जाणवले नाही. सेटवरही मी तिला मॅम म्हणूनच हाक मारायचे इतके प्रोफेशनल वातावरण तिथे असायचे. घरात आणि सेटवर मला तिचे वेगवेगळे रूप पाहायला मिळायचे. सेटवर मला ती नेहमी प्रोफेशनल आणि कामात गुंतलेली दिग्दर्शिका दिसायची तर घरी मला तिच्यात प्रेमळ आई दिसायची.

आईनेच या सिनेमासाठी तुझी निवड केली का?
– या सिनेमाची दिग्दर्शिका माझी आईच असल्यामुळे खूप लोकांनी हा प्रश्न मला विचारला. पण खरे पाहायला गेले तर माझी या सिनेमासाठी निवड निर्माते मोहसिन अख्तर यांनी केली आहे. सिनेमाचे लेखक शिरीष लाटकर यांनी मोहसिन यांना माझा एक लघुपट दाखवला. तो लघुपट पाहूनच मोहसिन यांनी मला सिनेमाची ऑफर दिली. माझ्या निवड प्रक्रियेत आईचा जराही सहभाग नव्हता. बारावीला असताना मी अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची माझी इच्छा आईला बोलून दाखवली होती. परंतु माझे पदार्पण कोणत्या तरी दुसऱया दिग्दर्शकाच्या चित्रपटातून व्हावे असे तिला वाटायचे.

इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहेस का?
– मला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. आधी माझे वजन खूप जास्त असल्यामुळे मला अॅक्टिंग करायचीय हेदेखील मी कुणाला सांगू शकत नव्हते. माधुरी सिनेमा करण्यापूर्वी मी तब्बल 25 किलो वजन घटवले. अभिनयाचे देखील मी रीतसर प्रशिक्षण घेतले आहे. बडोद्यात असताना मी नीरज कब्बीर सरांकडे थिएटर वर्कशॉर्प केले आहे. त्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांच्याही वर्कशॉपमध्ये अभिनयाचे धडे गिरवले.