जिद्द + संघर्ष = प्रियदर्शन

692

>> मिलिंद शिंदे

प्रियदर्शन जाधव. जवळच्यांसाठी दर्शन. रंगभूमीचा ठाशीव पाया आणि जिद्द यातून आज त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

माझे मुंबईत दोन फ्लॅट आहेत, दर्शन त्यातला एक मी तुला देते आणि एक मी माझ्यासाठी ठेवते.’’ प्रियदर्शन जाधवला तो मुंबईत आल्यावर ज्या साधना मावशीकडे राहत होता त्या म्हणाल्या. साधना मावशी म्हणजे त्या काही नात्यातल्या मावशी नव्हत्या, तर दर्शनच्या आईच्या त्या मैत्रीण. मुंबईत काय, कुठेही कुणी आपला फ्लॅट असा कुणाच्या नावावर करतं का? पण साधना मावशीची दिलदारी न्यारीच. तरीही वास्तवाचं भान असलेल्या दर्शननं हा प्रस्ताव नम्रपणे नाकारला. मी जर आताच हा फ्लॅट घेऊन बसलो तर माझी प्रगती खुंटलीच असं त्याला वाटलं आणि त्यानं तसंच त्यांच्याकडं राहणं सुरू केलं. दर्शनसाठी साधना मावशी दैवतच जणू. कोल्हापूरहून मुंबईत आलेल्या दर्शनच्या लालनपालन, त्याच्या क्षेत्राच्या येण्या-जाण्याच्या वेळा सांभाळून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.

कोल्हापुरात मॅट्रिकला नापास झाल्यावर त्याला मुंबई खुणावू लागली. त्याच्यातला कलावंत डोकं वर काढू लागला होता. ‘वस्त्रहरण’, ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’वर अनेक पिढय़ा वाढल्या. त्यातलाच एक दर्शन. दर्शन या कॅसेट्स वारंवार ऐकून त्यांची नक्कल करू लागला. त्याचा गुण जन्मजातच होता. आईवडिलांचा या सगळ्यांना नकार नव्हता म्हणजे प्रोत्साहन आहे असं समजून दर्शननं मुंबई गाठली. साधना मावशीकडे बिऱ्हाडं ठेवलं आणि कामाला जुंपला. त्यातच त्यानं दहावी पास करून रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. भेटीगाठी सुरू केल्या आणि नकला करण्याचा गुण कामी आला. देवेंद्र पेमला तेव्हा एका नकलाकार मुलाला नक्कल आणि अभिनय यातला फरक लक्षात येत नाही आणि त्याची कशी गल्लत होते असं काहीसं सांगणारं नाटक ‘तुमचा मुलगा करतो काय?’ यासाठी आवाज (नक्कल) काढणारा (विविध नटांचे) कलाकार हवा होता. चाचणी सत्रानंतर (ऑडिशन) दर्शनची निवड झाली आणि व्यावसायिक रंगभूमीवर दर्शनचं आगमन झालं. सोबतच रुपारेलच्या नाटय़वर्तुळात वावरणं चालू होतंच. दर्शननं बसवलेली ‘कोलाज’ 2002च्या आयएनटीची विजेती एकांकिका ठरली.

सवंगडी जमले, गोतावळा वाढला. साधना मावशीची साथ होतीच. मग एका धाडसानं जन्म घेतला. सिद्धार्थ जाधव, राहुल भंडारे आणि दर्शन जाधव यांनी एक व्यावसायिक नाटक करायचं ठरवलं. धाडसच. तिघेही तसे व्यावसायिक रंगभूमीला नवखेच नट. सिद्धार्थ जाधव, निर्माता राहुल भंडारे आणि लेखक – दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव ठरलं. तालमी सुरू झाल्या आणि या त्रिकुटाचं, रुपारेलच्या सवंगडय़ांचं ‘जागो मोहन प्यारे’ हे नाटक रंगभूमीवर आलं. तुफान गाजलं. सिद्धार्थ जाधवचं नाव झालं. राहुल भंडारे मोठा निर्माता म्हणून नावारूपास आला, पण म्हणावा तसा रिव्हय़ू दर्शनला मिळाला नाही. तो पुन्हा झपाटल्यासारखा काम करू लागला. प्रकाश बुद्धिसागर यांच्या तालमीत तो आणखी तयार होऊ लागला. ‘जागो मोहन…’ तुफान चाललं होतं. रुपेरी दुनियेत ‘आलो, जमलं, स्थिरावलो’ असं काहीच नसतं. दर्शनला लक्षात आलं, पण 2007, 2008, 2009 या तिन्ही वर्षांत प्रवास थोडा भरकटला. डिप्रेशन वाढलं. दिशा कळेनाशी झाली.

अशा अवस्थेत पावलं जिकडं नेतील तिकडे जाऊ लागला आणि तो जाऊन ठेपला ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात. तो वृत्तवाहिनीत काम करू लागला, पण त्याला स्वतःला आणि त्याच्या सहकाऱ्यांनाही हे कळत होतं की, हे याचं क्षेत्र नाही. त्याची तगमग त्यांना कळत होती. तो तिथं रमत नव्हता. हे माझं जग नाही हे त्याला जाणवत होतं. शेवटी सहकाऱ्यांच्या सांगण्यावरुन त्यानं ती नोकरी सोडली. पुन्हा लेखणी हाती धरली आणि ‘प्यार किया तो डरना क्या’ हे नाटक हातावेगळं केलं. ते रंगभूमीवर आलं. तुफान चाललं. दर्शनला हायसं वाटलं. तो सावरायला लागला स्वतःला. त्याच काळात ‘फु बाई फु’ हे अतिशय गाजलेलं विनोदपर्व अवतरलं. दर्शन त्यात सामील झाला. एका पर्वाचा विजेताही झाला. अंतिम फेरीच्या सादरीकरणाला रवी जाधव उपस्थित होता. दर्शनचं काम पाहून तो दर्शनला भेटला आणि ‘‘मी एक सिनेमा करतोय. त्यासाठी तू संवाद लिहितोयस’’ असं सांगितल्यावर दर्शन सुखावला. रवी जाधवच्या चमूत दाखल झाला.

संवाद लेखनाबरोबरच दर्शनवर आणखी एक जबाबदारी पडली- त्या सिनेमात काम करणाऱ्या प्रथमेश परब याला शिकवण्याची, माध्यमभान देण्याची, सिनेमासाठी तयार करण्याची. हे सगळं रवी पाहत होता. मग ‘टाइमपास’ पडद्यावर अवतरला. त्यानंतरच्या एका सोहळ्यात रवी जाधवनं घोषणा केली की, ‘‘मी ‘टाइमपास टू’ करतोय (‘टीपी टू’) आणि त्याचा नायक आहे प्रियदर्शन जाधव.’’ असंच नाव अवतरलं रुपेरी पडद्यावर. कोल्हापूरहून आलेला हुनरबाज कलाकार रवी जाधवच्या सिनेमाचा प्रमुख नट झाला होता. हाही सिनेमा खूप गाजला. प्रियदर्शन जाधव हे नाव मुख्य प्रवाहात सामील झालं. एकापाठोपाठ एक सिनेमे येऊ लागले. ‘सायकल’, ‘हंपी’ हे प्रकाश कुंटे यांचे चित्रपट, अवधूत गुप्ते यांचा ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ यांनीही नाव कोरलं. या संपूर्ण प्रवासात साधना मावशी आणि नव्यानं सुखदुःखात सामील झालेला मित्र जितेंद्र जोशी जवळ आला, आणखी आधार मिळाला. जितू जोशी जवळचा मित्र झाला. आणखी काय करता येईल हे आंदोलन मनात सुरू होतं आणि एका कथानकानं मनात घर केलं. कागदावर उतरलं.

‘मस्का’ या नावानं सगळं तयार, पण निर्माता मिळेना. दर्शननं तब्बल चाळीस निर्मात्यांना ‘मस्का’चं कथानक ऐकवलं. चाळीसवेळा वाचन…? अखेर प्रशांत पाटील यांना ते भावलं आणि दर्शनची मेहनत रुपेरी पडद्यावर झळकली. दर्शनला ज्या ज्या लोकांनी हा सिनेमा पाहावा असं वाटायचं त्या सगळ्यांनी हा सिनेमा पाहिला. निष्कर्ष- आज त्याच्याकडं आठ चित्रपट आहेत. तो आठ चित्रपट दिग्दर्शित करतोय. म्हणजे पुढची किमान पाच वर्षे तो तुफान व्यस्त आहे. या सगळ्या धकाधकीत एक हळवा कोपरा होताच. एक नातं उमलत होतं. 2002 ला खुलायला लागलेलं ते बंधन आणखी घट्ट झालं ते 2008 ला. वैभवी गुप्ते आणि प्रियदर्शन जाधव यांचा विवाह. साधना मावशी, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव या सवंगड्यांत वैभवी यांचंही नाव सामील झालं. कुमक वाढली. वैभवी एका नामांकित परदेशी बँकेत उच्च पदावर आहेत. येत्या काळात ‘जागो मोहन प्यारे’ या त्याच्या पहिल्या यशस्वी कलाकृतीवर (नाटकावर) सिनेमा त्याच नावाने येतोय याहून काय मोठं यश त्याच्या लेखी असावं. तो आज आनंदी आहे. पत्नी आणि कुटुंबासोबत स्थिरावलाय. काही लोक संधी देतात, पण पैसे देत नाहीत आणि जे पैसे देतात ते एक्स्पोझ होऊ देत नाहीत. दर्शन गडय़ा, तू पुढची पाच वर्षे तुफान व्यग्र आहेस. तुझ्या या कलाकृती येऊ देत यार. संधी आणि पैशांचा बार उडणारच. आतषबाजीच नुस्ती.

आपली प्रतिक्रिया द्या