करकंब भागातील चोऱ्यांचा तपास कधी? नागरिकांचा संताप; दोन वर्षांतील एकाही चोरीचा तपास नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील दोन वर्षांमध्ये करकंब पोलीस ठाणे अंतर्गत करकंब, भोसे, बार्डी, मेंढापूर या परिसरात चोरटय़ांनी अनेक धाडसी चोऱया केल्या आहेत. परंतु त्याचा अद्यापि तपास लागलेला नाही. त्यामुळे चोरटय़ांना पोलिसांची भीती राहिली नसून, त्यांचे धाडस वाढत चालले आहे. दोन वर्षांत एकाही चोरीचा तपास लागत नाही, त्यामुळे या भागातील चोऱया कधी थांबणार आणि पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

सोमवार (दि.12) रोजी भरदुपारी मेंढापूर येथील बंद घराचे कुलूप तोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. तर एक फेब्रुवारी रोजी करकंब येथील साईप्रसाद मशिनरी या शेती साहित्याच्या दुकानाची भिंत फोडून सहा लाखांचे साहित्य चोरीस गेले आहे. यापूर्वीही मे 2023 मध्ये अनवते वस्ती येथील भरदिवसा घर फोडून पावणेचार तोळे सोन्यासह रोख रक्कम चोरटय़ांनी लंपास केली होती. जून 2023 मध्येही साडेपाच तोळे सोने जाधव यांच्या घरातून चोरटय़ांनी पळविले होते.

जानेवारी 2023 मध्ये येथील मोरे यांचे कृषी मशिनरीचे दुकान फोडून त्यातीलही ऐवज चोरटय़ांनी लंपास केलेला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली होती. जुलै 2023 मध्ये बार्डी येथील सुदाम वसेकर यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. एप्रिल 2023 मध्ये तर येथील एका पोलीस कर्मचाऱयाच्याच घरातून साडेचार तोळे सोन्यासह रोख रक्कम लंपास झाली होती.

फेब्रुवारी 2022 मध्ये भोसे पाटी येथील कापडाचे दुकान फोडून तब्बल सात लाख रुपयांचा माल लंपास केला होता. याशिवाय 1 फेब्रुवारीच्या रात्री फोडण्यात आलेले काळे यांचेच साईप्रसाद मशिनरी हे दुकान यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये फोडून अशाच प्रकारचा ऐवज चोरटय़ांनी पळवून नेला होता.

या सर्व घटनांचा तपास करण्यात करकंब पोलिसांना अपयश आलेले आहे. त्यामुळे चोरटय़ांची दहशत वाढत असून, भिंत फोडण्यापासून दिवसाढवळ्या चोऱया करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या चोऱयांचा तपास लावून करकंब पोलीस चोरटय़ांचा कायमचा बंदोबस्त कधी करणार? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

चोरटय़ांनी माझे शेतीविषयक साहित्याचे दुकान दोन वेळा फोडून दोन्ही वेळेस मिळून सुमारे चौदा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पण अद्यापि एकाही चोरीचा तपास लागला नाही. दोन वर्षांपूर्वीच्या चोरीचा तपास लावून पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर दुसरी चोरी झालीच नसती. भिंती फोडून जर चोऱया होत असतील तर व्यापाऱयांनी उद्योग कसा करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
– शहाजी काळे, व्यावसायिक