कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू

1488

राज्यात कोरोनाचे 31 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईत कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील शाळा, कॉलेज आणि मॉल्स बंद राहतील असे आदेश राज्य सरकारने यापूर्वीच दिले आहेत.

देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार मुंबई शहरामध्ये कोणत्याही खाजगी टूर ऑपरेटर यांनी समूहाने प्रवासाचे आयोजन अथवा गटागटाने देशांतर्गत व परदेशी किंवा सुट्टीच्या दौ-याचे आयोजन यांना मानवी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोना च्या संक्रमणावर प्रतिबंध बसावा या उद्देशाने मुंबई शहरामध्ये सी.आर.पी.सी कलम 144 अन्वये सदरचा आदेश हा विशेष करुन व्यावसायिक प्रवासाचे आयोजन टाळण्याच्या उद्देश्याने देण्यात आला आहे.

राज्य सरकार खर्च करणार

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने व्यायामशाळा, मॉल,जलतरण तलाव आणि सिनेमाघरे 30 मार्चपर्यंत बंद केली आहेत. तसेच राज्यातील सरकारी आणि खासगी शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. त्यामुळे जनतेने घाबरण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांचा खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राज्यात रुग्णांची संख्या 31

दिवसेंदिवस कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी यात आणखी 14 रुग्णांची भर पडली. शनिवारी नऊ जणांच्या तपासणीचे नमूने पॉझिटीव्ह आले आहेत. यातील एक नागपूर, दोघे यवतमाळ, 1 कामोठे पनवेल, 1 मुंबईचा, 1 नवी मुंबईचा, 1 कल्याणचा आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. यातील 15 रुग्ण पुण्याचे, 5 मुंबईचे, 4  नागपूरचे, 2 यवतमाळचे आणि प्रत्येकी 1 ठाणे, नगर, कामोठे पनवेल, नवी मुंबई आणि कल्याणचे आहेत. या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृति स्थिर आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या