आयफोनसाठी तब्बल 17 तास रांग! खरेदीसाठी मुंबई, दिल्लीत उडाली झुंबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅलिफोर्निया येथे झालेल्या इव्हेंटमध्ये ‘आयफोन 15 सीरिज’ लाँच करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचे प्री-बुकिंग सुरू झाले. आज हा फोन खरेदीसाठी मुंबई आणि दिल्लीतील अधिकृत रिटेल स्टोअर्समध्ये अक्षरशः झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. तब्बल 17 तास रांगेत उभे राहून ग्राहकांनी फोनची खरेदी केली.

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील अॅपल स्टोअरमध्ये लाँच झालेले नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी 21 सप्टेंबरच्या दुपारपासूनच रांगा लावल्या होत्या. हिंदुस्थानातील पहिल्या अॅपल स्टोअरमध्ये पहिला नवीन आयफोन घेण्यासाठी आपण 17 तास रांगेत प्रतीक्षा केल्याचे अहमदाबादवरून आलेल्या एका ग्राहकाने वृत्तवाहिन्यांना सांगितले. मुंबईतील स्टोअरबाहेर देशभरातून आलेल्या ग्राहकांनी रांगा लावल्याचे चित्र होते.

‘आयफोन 15’ सीरिजमध्ये ‘आयफोन 15’, ‘आयफोन 15 प्लस’, ‘आयफोन 15 प्रो’ आणि ‘आयफोन 15 प्रो मॅक्स’ या चार मॉडेल्सचा समावेश आहे. ‘आयफोन 15’ आणि ‘आयफोन 15 प्लस’मध्ये A16 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ‘आयफोन 15 प्रो’ मॉडेल्समध्ये ऍक्शन बटण दिले आहे. यात टायटॅनियम बॉडीचा वापर करण्यात आला आहे.

किंमत किती?
‘आयफोन 15’ ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. ‘आयफोन 15 प्लस’ची किंमत 89,900 रुपये तर ‘आयफोन 15 प्रो’ची किंमत 1,39,900 रुपये आणि ‘आयफोन 15 प्रो मॅक्स’ची किंमत 1,59,900 रुपयांपासून सुरू होते.