IPL 2019 : ‘RCB’चा पराभवाचा चौकार, तरीही विराटला विजेतेपदाची आशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयपीएलमध्ये दिग्गज फलंदाज आणि गोलंदाजांचा भरणा असलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ अद्याप एकदाही विजेतेपद जिंकू शकलेला नाही. 2019 च्या मोसमापूर्वी विराट कोहलीच्या या संघाकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. परंतु पहिले पाढे पंचावन्न प्रमाणे विराटचा संघ सलग चार सामन्यांमध्ये लाजिरवाण्या पद्धतीने पराभूत झाला आहे.

मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात बंगळुरुला राजस्थान रॉयल्सच्या संघाडून पराजय पत्करावा लागला. सलामीवीर जोस बटलरच्या अर्धशतकीय (59 धावा) बळावर राजस्थानने घरच्या मैदानावर बंगळुरुचा 7 विकेटने पराभव करत यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवला. विराटच्या संघाचा हा सलग चौथा पराभव आहे. सलगच्या पराभवामुळे सोशल मीडियावर विराटविरोधात नेटिझन्सनी रान उठवले असून कर्णधारपद सोडण्याची मागणीही काहींनी केली आहे.

बंगळुरुची यंदाच्या आयपीएलमधील सुरुवात खराब झाली. पहिल्या सामन्यात चेन्नईविरोधात बंगळुरुचा संघ फक्त 70 धावा बाद झाला होता आणि चेन्नईने सात विकेटने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मुंबईने सहा धावांनी पराभव केला होता, तर हैदराबादने बंगळुरुचा 118 धावांनी पराभव केला होता. आता राजस्थानविरुद्धही पराभव झाल्याने नेटकरी भडकले आहेत.

विराटला अद्यापही विजेतेपदाची आशा
सलगच्या पराभवानंतरही विराटने आयपीएल विजेतेपदाची आशा सोडलेली नाही. येणाऱ्या लढतींमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू आणि फासे उलटवून दाखवे असे विराट म्हणाला. तसेच आगामी सामन्यांमध्ये संघ बदलाचे संकेतही विराटने दिले आहेत.