IPL 2020 – कोण पोहचणार प्ले ऑफमध्ये? मुंबई-बंगळुरूमध्ये रस्सीखेच

सर्वाधिक चार वेळा चॅम्पियन बनलेला मुंबई इंडियन्सचा संघ आणि पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्यासाठी जिवाचे रान करीत असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये उद्या आयपीएलमधील महत्त्वाची लढत रंगणार आहे. दोन्ही संघ या लढतीत विजय मिळवून प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील. उभय संघांनी आतापर्यंत 11 लढतींमधून सातमध्ये विजय मिळवले असून चार लढतींमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे या लढतीत कोणता संघ बाजी मारतोय याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या असतील, मात्र या लढतीत विजय मिळवणारा संघ आयपीएलमधील प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ असणार आहे.

मागील लढतीत दोन्ही संघांचा पराभव

मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांना मागील लढतीत पराभव स्वीकारावा लागला आहे. बेन स्टोक्स, संजू सॅमसनच्या फलंदाजी झंझावातात मुंबई इंडियन्सचा पालापाचोळा झालाय. ऋतुराज गायकवाडच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवले आहे. या पराभवांमुळे दोन्ही संघांची प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची प्रतीक्षा वाढलीय.

डी काॅक, किशन, पोलार्ड, हार्दिक सुसाट

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी या मोसमात ठसा उमटवला आहे. कर्णधार रोहित शर्माने 260 धावा केल्या असून मागील काही लढतींमध्ये तो दुखापतीमुळे खेळू शकलेला नाहीए. पण क्विंटॉन डी काॅक (374 धावा), इशान किशन (298 धावा), कायरॉन पोलार्ड (214 धावा) व हार्दिक पांडय़ा (224 धावा) यांनी या संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे उद्या होणाऱया लढतीतही त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेलच.

कोहली, डिव्हिलीयर्स वि. बुमराह, बोल्ट

दोन्ही संघ स्टार खेळाडूंनी सजलेले आहेत. कर्णधार विराट कोहली (415 धावा), ए बी डिव्हिलीयर्स (324 धावा), अॅरोन फिंच (236 धावा) या दिग्गज खेळाडूंसह युवा देवदत्त पडीक्कल (343 धावा) याने या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. उद्याच्या लढतीत या खेळाडूंसमोर जसप्रीत बुमराह (17 बळी), ट्रेंट बोल्ट (16 बळी), जेम्स पॅट्टीनसन (11 बळी) या अनुभवी व स्टार गोलंदाजांचे आव्हान असणार आहे.

मॉरिस, चहलवर जबाबदारी

नवदीप सैनीला मागील लढतीत दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे उद्याच्या लढतीत तो खेळेल की नाही याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. तो खेळला नाही तर ख्रिस मॉरिस, मोहम्मद सिराज व इसिरू उडाना या वेगवान गोलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. तसेच अनुभवी युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांच्या खांद्यावर फिरकीची मदार असणार आहे.

  • आजची लढत – मुंबई इंडियन्स वि.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी रात्री 7.30 वाजता
आपली प्रतिक्रिया द्या