IPL.2020 – बंगळुरूचा ‘गेम ओव्हर’, हैद्राबाद-दिल्लीत रंगणार दुसरा क्वालिफायर सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखेरच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत सनरायझर्स हैद्राबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे हैद्राबादने क्वालिफायर-2 मध्ये धडक दिली असून येथे वॉर्नरच्या संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे. तर या पराभवामुळे विराटच्या संघाचा ‘गेम ओव्हर’ झाला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 131 धावा केल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैद्राबाद संघाची दमछाक झाली. मात्र अनुभवी केन विलीयम्सन आणि जेसन होल्डर यांनी अर्धशतकीय भागीदारी करत 2 चेंडू बाकी असताना संघाला विजय मिळवून दिला.

विलीयम्सन याने नाबाद अर्धशतक ठोकले. तर होल्डरने गोलंदाजीत 3 बळी घेतले आणि फलंदाजीतही 24 धावांचे उपयुक्त योगदान दिले. अखेरच्या षटकात नवदीप सैनी याला सलग 2 चौकार ठोकत होल्डरने हैद्राबादला विजयी केले.

डिव्हीलिअर्सची झुंज

प्रथम फलंदाजी केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून एकट्या डिव्हीलिअर्सने झुंज दिली. त्याने 43 चेंडूत 56 धावा केल्या, तर फिंचने 32 धावांची खेळी केली. इतर फलंदाज विशेष चमक दाखवू शकले नाही. त्यामुळे बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

हैद्राबाद कडून जेसन होल्डर याने धारधार गोलंदाजी केली. त्याने विराट कोहली, देवदत्त पडीकल आणि शिवम दुबे यांना बाद केले. तर टी. नटराजन याने डिव्हीलिअर्स आणि सुंदरला बाद करत त्याला चांगली साथ दिली. नदीमने फिंचचा बळी घेतला.