
आयपीएलचा यंदाचा मोसम 9 एप्रिलपासून हिंदुस्थानात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेने हिंदुस्थानसह जगभरातील क्रिकेट बोर्ड व क्रिकेटपटू यांच्यावर प्रभाव टाकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरही आयपीएलचे वेळापत्रक पाहून तयार केले जाते. याच आयपीएलने हिंदुस्थानी क्रिकेटचा कायापालट केला आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघ आयपीएलच्या श्रीगणेशानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर 22 टक्के जास्त सामने जिंकलाय. बीसीसीआयच्या तिजोरीत 273 टक्क्यांनी वाढ झालीय. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचा करारही 12 पटीने वाढलाय.
60 टक्के सामने जिंकलेत
2008 सालाआधी हिंदुस्थानी संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 38 टक्के लढती जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत टीम इंडिया 60 टक्के सामने जिंकलाय. याचाच अर्थ चक्क यामध्ये 22 टक्क्यांनी वाढ झालीय. कसोटी क्रिकेटमध्ये मागील 13 वर्षांमध्ये हिंदुस्थानी संघ 132 सामन्यांपैकी 68 सामने जिंकलाय. या विजयाची टक्केवारी 51 होय. तसेच वन डे क्रिकेटमध्ये आयपीएलनंतर खेळल्या गेलेल्या 311 सामन्यांपैकी 193 सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात हिंदुस्थानचा संघ यशस्वी ठरलाय. ही टक्केवारी 62 होय. तसेच 132 टी-20 सामन्यांपैकी टीम इंडियाने 82 सामन्यांमध्ये यशाची चव चाखलीय. याचीही टक्केवारी 62 होय.
67 टक्के कमाई या स्पर्धेनेच
आयपीएलआधीही बीसीसीआय हे जगातील धनाढय़ बोर्ड म्हणून ओळखले जात असे, पण आयपीएलच्या आगमनानंतर बीसीसीआय व इतर बोर्डामध्ये कमालीची तफावत दिसून येत आहे. बीसीसीआयला 67 टक्के कमाई ही आयपीएलमधून मिळते हे विशेष. आयपीएलआधी बीसीसीआयची कमाई एक हजार कोटी होती. 2019-20 सालामध्ये बीसीसीआयने 3730 कोटींची कमाई केली. यापैकी 2500 कोटी हे आयपीएलमधून मिळाले. याचा अर्थ आयपीएलमुळे बीसीसीआयच्या कमाईत 273 टक्क्यांनी वाढ झालीय.
सर्वोच्च करार मिळवणाऱया खेळाडूला 7 कोटी अन् रणजीपटूला दोन लाख
2007 सालामध्ये सर्वोच्च करार मिळवणाऱया हिंदुस्थानी खेळाडूला 60 लाख रुपये मिळत होते. आता या खेळाडूला तब्बल 7 कोटी रुपये मिळू लागले आहेत. तसेच 2006 सालामध्ये एक रणजी सामने खेळणाऱया खेळाडूला 16 हजार रुपये मिळत असे. आता एक रणजी सामना खेळणारा क्रिकेटपटू जवळपास दोन लाख रुपयांची कमाई करतोय.




























































