धोनी, रोहितनंतर KKR चा कर्णधार मॉर्गनला BCCI च्या नव्या नियमांचा फटका, सामनाही गमावला आणि …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी रात्री आयपीएलच्या 14 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये सामना रंगला. अखेरच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेला हा सामना चेन्नईने 17 धावांनी जिंकला. कोलकाताचा आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि पॅट कमिन्स यांनी शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र ते सामना जिंकून देण्यात अपयशी राहिले.

मुंबईतील वानखेडे मैदानात झालेला हा सामना कोलकाताने तर गमावलाच, पण संघाला आणखी एक दणका बसला आहे. केकेआरचा कर्णधार इयान मॉर्गन याला सामना संपल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 12 लाखांचा दंड ठोठावला. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार मॉर्गनला चेन्नईविरूद्ध स्लो ओव्हर रेटसाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

काय आहे नियम?

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला सामना खेळण्यासाठी आणि प्रत्येक ओव्हरला देखील वेळ ठरवून दिलेला आहे. प्रत्येक संघाने आपले 20 ओव्हर 90 मिनिटांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. 90 मिनिटांत दोन्ही संघांना अडीच मिनिटांचा स्ट्रॅटेजीक टाईम आऊट (अर्थात ब्रेक) मिळेल. म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघांला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर आणि एका तासामध्ये 14.1 ओव्हर टाकणे बंधनकारक आहे. मात्र मॉर्गन असे करण्यात अपयशी ठरल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला.

IPL 2021 – धोनीची चलाखी पाहून तिनं आधीच म्हटलं होतं, याच ‘चेंडूवर सामना जिंकणार’

दंड होणारा तिसरा कर्णधार

दरम्यान, आयपीएल 2021 मध्ये या नव्या नियमाचा फटका बसलेला इयान मॉर्गन तिसरा कर्णधार आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

…तर दंड दुप्पट

आयपीएलच्या 14 व्या हंगामात तिन्ही कर्णधारांकडून पहिल्यांदा अशी चूक घडल्याने त्यांना 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. आगामी काळात त्यांच्याकडून अशी चूक पुन्हा झाल्यास दंड दुप्पट (24 लाख) होईल. तसेच कर्णधारासह प्लेइंग 11 मधील प्रत्येक खेळाडूच्या मॅच फीमधील 25 टक्के रक्कम किंवा 6 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दंड म्हणून कापण्यात येईल. तसेच तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधाराला 30 लाखांचा दंड आणि एका लढतीची बंदी अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.