
अमेरिकेने बंदर अब्बास विमानतळाजवळ केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने आज कुवेतमधील अमेरिकी हवाई तळावर जोरदार हल्ला चढवला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डने (आयआरजीसी) हल्ल्याच्या या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेच्या कुठल्याही हल्ल्याला तोडीस तोड उत्तर दिले जाईल, असा इशाराही आयआरजीसीने दिला.
इराण व अमेरिकेमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव कायम आहे. इराणने होर्मुझवर पूर्ण नियंत्रण ठेवले असून तेथून इंधन वाहतुकीवर बंदी घातली आहे. अमेरिकेनेही होर्मुझभोवती वेढा घालून इराणची नाकेबंदी केली आहे. गुरुवारी सकाळी होर्मुझच्या हद्दीत दोन्ही देशांच्या सैन्यात गोळीबार झाला. होर्मुझ ओलांडू पाहणाऱ्या एका अमेरिकी टँकरवर इराणी नौदलाने हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेने इराणच्या बंदर अब्बास विमानतळाजवळ हल्ला करून इराणचे चार ड्रोन पाडले. याचा बदला म्हणून इराणने थेट कुवेतमधील अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र डागले.
त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
अमेरिकेची ओमानला धमकी
होर्मुझच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेचा आखातातील मित्र असलेल्या ओमानला धमकी दिली. होर्मुझच्या मुद्द्यावर इराणची बाजू घेतल्यास ओमानला उद्ध्वस्त करून टाकू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. होर्मुझचा मार्ग वापरणाऱ्या जहाजांना टोल लावण्याचा इराणचा प्रस्ताव आहे. ओमानचा यास पाठिंबा असल्याचे बोलले जाते. त्यावरून ट्रम्प यांनी ओमानला धमकावले आहे.



























































