दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यावर बसून काडेपेटीशी खेळणारा ‘हा’ हेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बगदाद

कॅप्टन हरीथ अल सूडानी इराकच्या गुप्तहेर खात्यातील धाडसी आणि कृर्तृत्वनान अधिकारी…अनेक निष्पाप जीवांना इसिसच्या विळख्यातून सोडवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी धाडसाने अनेकांचे जीव वाचवले असले तरी इसिसमध्ये राहून त्यांच्याशीच पंगा घेण्याचे धाडस सोपे नव्हते. मात्र, सूडानी यांनी ते लीलया पेलले. सुमारे 16 महिने इसिसमध्ये त्यांनी अंडरकव्हर एंजट म्हणून काम केले. या काळात त्यांनी इसिसच्या 18 आत्मघाती हल्ल्यांचा आणि 30 बॉम्बस्फोटांचा कट हाणून पाडला. मात्र, त्यांच्या अखेरच्या मोहिमेत अधिकाऱ्यांना माहिती देताना इसिसने त्यांना पकडले आणि त्यांची मोहिमेला पूर्णविराम मिळाला.

सूडानी यांनी इसिसमध्ये जाऊन त्यांचा विश्वास संपादन केला आणि अल्पावधीतच मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आली. तिथेच त्यांनी अर्धी मोहीम जिकंली होती. इसिसकडून घातपातासाठी देण्यात येणारी स्फोटके बदलून ते बनावट स्फोटके ठेवून कमी तीव्रतेचा स्फोट घडवून आणायचे. अशाप्रकारे इसिसच्या हल्ल्यातून लाखो लोकांचे जीव वाचवले. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इसिसच्या योजनांची माहिती देताना इसिसने त्यांना पकडले आणि निष्ठूरतेने गळा कापून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनी हरीथ यांचा अभिमान असल्याचे सांगितले. माझ्या मुलामुळे अनेक निष्पापांचे जीव वाचले आहेत. त्याच्या या धाडसासाठी आम्हाला त्याचा अभिमान असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले.

सूडानी यांनी एवढ्या गुप्तपणे काम केले की त्यांच्या कुटुंबीयांनाही ते कोणत्या मोहिमेवर आहेत, याबाबत कोणतीच माहिती नव्हती. त्यांनी इसिसच्या अनेक हल्ल्यांचे कट चलाखीने उधळून लावले. दहशतवाद्यांमध्ये जाऊन त्यांच्याविरोधातच काम करणे म्हणजे दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यावर बसून काडेपेटीशी खेळण्यासारखे असते. ते धाडस दाखवणारे सूडानी हे धाडसी अधिकारी होते. त्यांचे कार्य देश कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत इराकच्या गुप्तहेर खात्याने त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आहे.