
जोगेश्वरी पूर्व येथील इस्माईल युसूफ महाविद्यालयाला 90 वर्षे पूर्ण होत असून पुढील शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेच्या सर्व विषयांत पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रम (पीएच.डी) सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाविद्यालयाची नवीन इमारत बांधण्याचा संस्थेचा विचार असून मुलींसाठी वसतिगृहाचीदेखील आवश्यकता आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या त्यामुळे अपुरी पडणारी जागा तसेच वर्ग, महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या इमारतीमध्ये बरीच पडझड झाली असून ही इमारत धोकादायक अवस्थेत आहे. या इमारतीच्या डागडुजीवर सातत्याते लाखो रुपये खर्च करण्यात येत असल्याने या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याची आवश्यकता आहे. या नव्या इमारतीत ग्रंथालय, वाचनालय कक्ष, ऑनलाइन स्पर्धा, परीक्षा केंद्र, सेमिनार हॉल, नवीन विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्रयोगशाळा व वर्ग खोल्या आदी सुविधा देण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या नवीन इमारतींचे एस्टिमेट तयारही केले आहे. निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य करावे, असे निवेदन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती व्हावळ यांनी आमदार वायकर यांना दिले होते. त्यानुसार वायकर यांनी निधीची मागणी केली आहे.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात राज्य शासनाच्या अखत्यारीतील इस्माईल युसूफ एकमेव महाविद्यालय आहे. या विद्यालयात तिन्ही शाखांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी.पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. एकूण 8 स्वयं अर्थसहाय्य अभ्यासक्रम सुरू असून महाविद्यालयाला 90 वर्षे पूर्ण होणार आहेत. येथे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे 6000 इतकी आहे.




























































