हमासचा हल्ला अचानक नाही; गुटेरस यांच्या वक्तव्याने इस्रायल भडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 18 दिवसांपासून इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेले युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. हमासचा हल्ला अचानक झाला नसून मध्य आशियातील चित्र अतिशय विदारक आहे. तसेच इस्रायलकडून गाझा पट्टीत होत असलेल्या हल्ल्यांमुळे तेथील नागरिकांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे असे म्हणत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटेनियो गुटेरस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत युद्धविरामाची मागणी केली. यावर इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एली कोहेन यांनी गुटेरस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे गुटेरस यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्याच बैठकीत अमेरिकेने इराणला अतिशय कडक शब्दांत इशारा दिला. त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. इराण हिजबुल्लाहला समर्थन देत असून इराणकडून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका यापुढे गप्प बसणार नाही असा थेट इशाराच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इराणला दिला. दरम्यान, इस्रायलने गाझा पट्टीतील हवाई हल्ले वाढवले असून अवघ्या 48 तासांत तब्बल 700 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

गुटेरस यांच्या वक्तव्यानंतर बैठक रद्द
इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एली कोहेन यांची गुटेरस यांच्यासोबत मंगळवारी रात्री उशिरा बैठक होणार होती. परंतु गुटेरस यांच्या वक्तव्यानंतर ही बैठकच रद्द करण्यात आली. गुटेरस हे दहशतवादाचे समर्थन करत असल्याचा आरोप कोहेन यांनी केला आहे.

लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, हमास, इस्लामिकची बैठक
लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, हमास आणि इस्लामिक जिहाद या तीन दहशतवादी संघटनांच्या टॉप कमांडर्सना इराणने एकत्र आणले असून या तिघांची एकत्रित बैठक बुधवारी झाली. या बैठकीत इस्रायलविरोधातील रणनीतीवर चर्चा झाली.

पॅलेस्टिनींचा 56 वर्षांचा कोंडमारा
हमासने केलेला हल्ला हा अचानक झालेला नाही असे सांगतानाच गेली 56 वर्षे पॅलेस्टिनी कोंडवाडय़ात असल्यासारखे जगत असल्याचे गुटेरस यांनी म्हटले आहे. त्यांना राहण्यासाठी जमीन नाही. गाझापट्टीतील हजारो पॅलेस्टिनींना दुसरीकडे विस्थापित व्हावे लागले. राजकीयदृष्टय़ा पुनर्वसन व्हावे अशी त्यांची आशा होती. परंतु, इस्रायलकडून आता होत असलेल्या हल्ल्यांमुळे त्यांची ती आशाही मावळल्याचे गुटेरस यांनी म्हटले आहे.

आगीत तेल ओतू नका; अमेरिकेने ठणकावले
अमेरिकेला इराणशी संघर्ष नको. परंतु, इराण किंवा त्यांच्या वतीने कुणीही अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केले तर अमेरिका गप्प बसणार नाही, असा इशारा अमेरिकेचे कॅबिनेट मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसमोरच इराणला दिला. इस्रायलला मदत करणाऱ्यांविरोधात जर कुणी आघाडी उघडत असेल तर आगीत तेल ओतू नका असे त्यांना सांगावे लागेल, असेही अमेरिकेने ठणकावले.

– इस्रायलने गाझा पट्टीत 400 हवाई हल्ले केले. इमारती उद्ध्वस्त केल्या. 700 हून अधिक नागरिक मारले गेल्याचा पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा.
– गाझा पट्टीतील रुग्णालयांमध्ये इंधनाचा, औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रियादेखील भूल न देता सुरू.
– इस्रायलने संयुक्त राष्ट्रांची युद्धविरामाची विनंती फेटाळली. हमासला मुळापासून उपटून टाकण्याची पुन्हा शपथ घेतली.