हिंदुस्थानचा पॅलेस्टाईनला मदतीचा हात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी फोनवरून चर्चा केली. गाझा अल-अहली रुग्णालयामध्ये झालेल्या स्फोटात प्राण गमावलेल्या लोकांप्रति मोदी यांनी दुःख व्यक्त केले. तसेच आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादाच्या दृष्टीने मदत पाठवत राहू, असेही ते म्हणाले. दहशतवाद, हिंसाचार आणि तेथील ढासळत चाललेली सुरक्षा परिस्थिती यावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. दरम्यान, इस्रायल-हमास यांच्यातील रक्तरंजित संघर्षाचा आजचा 13 वा दिवस असून या युद्धात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 10 हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

गाझात मदत पोहोचवण्यासाठी इजिप्तला परवानगी
गाझा पट्टीतील स्थिती अतिशय भयावह असून अन्नधान्य, पाण्याचा तसेच औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. मृतदेह सडत चालले असून महामारी पसरण्याचाही धोका वाढला आहे. त्यामुळे मानवतावादी दृष्टीने इस्रायलने गाझा पट्टीत मदत पोहोचवण्यासाठी इजिप्तला परवानगी दिली आहे. दरम्यान, इस्रायलकडून हमासच्या तळांवर हवाई हल्ले सुरूच असल्याचे चित्र आहे.

दक्षिण गाझामध्येही हमासचे तळ असण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या सैनिकांनी दक्षिण गाझातील तळांवरही हवाई हल्ले केले. गुरुवारी सकाळी करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये 12 पॅलेस्टिनींचा मृत्यू, तर 40 जखमी झाले.

परवानगीनंतरही मदत पोहोचलीच नाही
इस्रायलच्या परवानगीनंतर युरोपियन युनियनने गाझा पट्टीतील नागरिकांसाठी मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अन्न, पाणी, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा दोन विमानांनी इजिप्तमध्ये दाखल करण्यात आल्याचे युरोपियन युनियनने म्हटले आहे. परंतु साठय़ावरील मर्यादा आणि इतर अडथळय़ांमुळे इजिप्तमधून पुढे गाझा पट्टीतील लोकांपर्यंत मदत पोहोचली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हमासला ज्यूंचे अस्तित्व पुसायचेय
हमास ही इसिससारखीच दहशतवादी संघटना आहे. अमेरिकेवरील ‘9/11’च्या हल्ल्याची आठवण सर्वांना करून द्यावी लागेल. हमासला दहशतवादी संघटना ठरवण्याविरोधात काही राष्ट्रे आहेत, पण त्यामुळे सत्य बदलणार नाही. हमासने जाणूनबुजून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले. त्यांना ज्यूंचे अस्तित्व पुसून टाकायचेय. चर्चा करण्यावर त्यांचा विश्वास नाही, अशा शब्दांत इस्रायलचे राजनैतिक अधिकारी गिलॅड एर्डन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या भरसभेत संताप व्यक्त केला.

– हमासने 206 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवल्याचे इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
– ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक गुरुवारी इस्रायलमध्ये दाखल झाले. आम्ही इस्रायलसोबत आहोत असे त्यांनी म्हटले असून जगातला संघर्ष वाढण्यापासून रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
– जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोलज यांनीही इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे.
– चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनी बीजिंग येथे इजिप्तचे पंतप्रधान मॅडबौली यांची भेट घेतली, इजिप्तने गाझा पट्टीतील नागरिकांना मानवतेच्या दृष्टीने मदत पोहोचवण्याची विनंती केली. तसेच पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा देणे हाच या संघर्षावर एकमेव मार्ग असल्याचे सांगितले.