‘ऑपरेशन सिंदूर’वेळी 400 वैज्ञानिकांनी 24 तास काम केले, ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांची माहिती

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाचे योगदान आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी इस्रोच्या 400 वैज्ञानिकांनी 24 तास काम केले, अशी माहिती ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांनी मंगळवारी दिली. अखिल भारतीय व्यवस्थापन संघ (एआयएमए) च्या 52 व्या राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते. ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी सर्व सॅटेलाईट्सने कोणत्याही अडथळ्याविना सातत्याने काम केले आणि लष्कराला आवश्यक मदत पोहोचवली. देशाच्या सुरक्षेसाठी सॅटेलाईट्स असणे खूप गरजेचे आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

‘इस्रो’च्या 400 हून अधिक वैज्ञानिकांनी पृथ्वी आणि उपग्रहांचा योग्य वापर करून लष्कराला मदत करण्यासाठी 24 तास डोळ्यांत तेल घालून काम केले. यासाठी अंतराळ एजन्सीने राष्ट्रीय सुरक्षेच्या आवश्यकतेसाठी आपल्या अंतराळयानातून उपग्रह डेटा उपलब्ध करून दिला, असे त्यांनी या वेळी सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी हिंदुस्थानी सॅटेलाईट 24 तास सक्रिय ठेवण्यात आली होती. नारायणन यांनी या वेळी गगनयान या आगामी प्रोजेक्टवरही भाष्य केले.

‘इस्रो’ने गगनयान योजनेसाठी 7700 जमिनी चाचण्या पूर्ण केल्या आहेत. यांतर्गत 2027 पर्यंत हिंदुस्थानची पहिली मानवरहित अंतराळयान पाठवण्याची योजना ‘इस्रो’ची आहे, असे ते म्हणाले. अंतराळ एजन्सीने गगनयान योजनेंतर्गत दोन मानवरहित मिशनला पूर्ण करण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळवली आहे. ‘इस्रो’ने 2035 पर्यंत स्वतःचे अंतराळ स्टेशन स्थापित करणे आणि 2040 पर्यंत चंद्रावर एक हिंदुस्थानी अंतराळ प्रवासी उतरवण्याचे कार्य करण्याचे ठरवले आहे.