अतिवृष्टीमुळे जगबुडीवरील पूल तब्बल सात तास वाहतुकीस बंद, प्रवासी लटकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, खेड

अतिवृष्टीमुळे जगबूडी नदीची पाणी पातळी वाढल्याने शुक्रवारी मध्यरात्री वाहतूकीस बंद करण्यात आलेला जगबुडी पूल तब्बल सात तासानंतर वाहतूकीस खुला करण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे महामार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी चांगलेच लटकले. पावसाळ्यात जुन्या जगबूडी पुलावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने कोट्यवधींचा निधी खर्च करून नव्या पुलाची उभारणी करण्यात आली मात्र संबधीत कामाच्या ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे आजही महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जून्याच पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.

सह्याद्रीच्या खोऱ्यात शनिवारी तुफान पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे सायंकाळी जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि खेड शहर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जगबुडीचे वाढलेले पाणी कधीही पुलावरून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने संध्याकाळपासूनच प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात केले. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पाण्याची पातळी आणखी वाढल्याचे लक्षात आले आणि जगबुडी पुल वाहतूकीस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पूल वाहतुकीस बंद झाल्याने हलकी वाहतूक खेड शहर -भोस्ते पुल मार्ग हायवे अशी वळवण्यात आली. मात्र जड वाहनांनी महामार्ग व्यापल्याने सर्वच मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीस बंद केलेला जगबूडी पुल तब्बल सात तास बंद राहिल्याने महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी रात्रभर रस्त्यातच लटकले.

रविवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास जगबुडीची पाणी पातळी कमी झाली आणी त्यानंतर जगबुडी पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. सकाळी महामार्ग वाहतूकीस खूला झाल्याने रात्रभर कंटाळलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. पूल वाहतुकीस बंद झाल्यापासून पहाटे पुल वाहतूकीस खुला होईपर्यंत मदत ग्रुपचे प्रसाद गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर पुलावर निगराणी ठेवण्याचे काम केले. पूल बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे जगबुडी पुलावरचा आजचा धोका टळला असला तरी उद्याचा धोकाही टळेल असे छातीठोकपणे सांगता येत नसल्याने या पुलावर सावित्री नदी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्दैवाने असे काही झाले तर त्याची पुर्ण जबाबदारी नव्या पुलाचे अप्रोच रोड करणारी कल्याण टोलवेज ही कंपनी असेल असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही