
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेविरोधात तळोजा तुरुंग प्रशासनाने विशेष एनआयए न्यायालयात तक्रार केली. वाझेला मधुमेहाचा त्रास असून त्याच्यावर हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे अस्वस्थ वाटल्यास त्याने तुरुंगातील रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक होते. मात्र तेथे उपचारास नकार देत त्याने तुरुंगातील नियमांचे उल्लंघन केले, असे तुरुंग प्रशासनाने तक्रारीत म्हटले आहे.
ऑण्टिलिया स्फोटके आणि व्यापारी मनसुख हत्या प्रकरणात वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष एनआयए न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यापुढे झाली. यावेळी तळोजा तुरुंग प्रशासनाने वाझेविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. वाझे हा तुरुंगातील रुग्णालयात उपचार घेण्याचे टाळतो. वाझेची ही भूमिका तुरुंग नियमावलीच्या विरोधी असल्याचे तुरुंग प्रशासनाने विशेष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.






























































