
तुम्ही राजकीय पक्षाच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका. विनाकारण वाद निर्माण करत आहेत. इतक्या वर्षांपासून गुजराती लोक राहायचे. कधी वाद नाही, काही नाही. मागील 10-12 वर्षांत कसं सुरू झालं हे? वरती दोन गुजराती बसलेत म्हणून काय वाटेल ते करू शकता का, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोसायटी व रस्त्यांवरील पांढऱया पट्टय़ा आणि मराठी-अमराठी वादावरून जैन समाजाच्या शिष्टमंडळाला सुनावले.
मालाड पूर्वेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या शिल्पावर जैन धर्मीयांचा पांढरा झेंडा लावल्यावरून वाद झाल्यानंतर आज जैन समाजाच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन मराठी समाजाची माफी मागितली. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी जैन साधूंसाठी सोसायटींमध्ये काढल्या जाणाऱया पांढऱया पट्टय़ा, मुंबईत अनेक ठिकाणी मराठी भाषेतील फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून आपल्या शैलीमध्ये चांगलेच सुनावले.





























































