
धुणे धुण्यासाठी आईसह गेलेला मुलगा पैठण मुख्य डाव्या कालव्याच्या पाण्यात पाय घसरुन पडला. यावेळी कालव्यात पडलेल्या मुलाला आई वाचायला गेली असता कालव्यात माय-लेकरे दोघेही बुडाले. या घटनेतील मुलाचा मृतदेह सापडला असुन आईच्या मृत देहाची शोध मोहीम सुरू आहे. ही घटना काल 3 मे रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दह्याळा येथे दुपारी 4 वाजता घडली आहे. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंबड तालुक्यातील दह्याळा येथे वंदना रवींद्र गारुळे (35) ही महिला कुंटबासोबत नातवाईकांकडे लग्नाला गेली होती. लग्नावरुन येवून आपला मुलगा सार्थक रवींद्र गारुळे (9) हे दोघे सोबत दुपारी 4 वाजता डाव्या कालव्यावर धुणे धुण्यासाठी गेले होते. यावेळी आई वंदना धुणे धुत असताना सार्थक खेळण्यासाठी कालव्यात उतरला. यावेळी कालव्यात खेळता खेळता त्याचा पाय घसरला. यावेळी त्याला वाचवायला आई वंदना गेली असता दोघेही कालव्याच्या पाण्यात बुडाले.
बराच वेळ होऊनही धुणे धुण्यासाठी गेलेले मुलगा, बायको घरी परत आले नसल्याने रवींद्र गारुळे हे कालव्यावर गेले. त्यांना कालव्याजवळ धुण्यासाठी नेलेले कपडे आणि चपला आढळून आल्याने दोघे कालव्यात बुडाल्याचे कळाले. नंतर रविंद्र गारुळे यांनी आरडा-ओरड केल्याने लोक जमा होवून कालव्यात शोधमोहीम सुरु केली. परंतु दोघेही आढळून आले नाही, परत दुसर्या दिवशी म्हणजे आज 4 मे रोजी आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान मुलगा सार्थक हा मुलगा अंतरवाली सराटी येथे कालव्याच्या पाण्यात तरंगताना येणार्या जाणार्या लोकांच्या निर्दशनास आल्यानंतर त्याला बाहेर काढले. त्याचे शवविच्छेदन वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून अंत्यविधी करण्यात आला आहे. परंतु अद्यापही वंदना गारुळे हिचा थांगपत्ता लागला नाही.
गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी घटनास्थळी व आरोग्य केंद्रात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यासंदर्भात कोणाची तक्रार दाखल झाली नसून महिलेच्या शोधासाठी नातवाईकांसोबत गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ही कालव्यात बुडालेल्या महिलेच्या शोधमोहीमेत सहभागी झाले आहेत. अद्यापही वंदना गारुडे यांचा शोध लागला नसल्याचे गावातून सांगण्यात आले आहे.






























































