जालन्यात वृद्ध महिलेची गळा आवळून हत्या, व्याजाच्या धंद्यातून खून?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील पार्वतीबाई रंगनाथ शिंदे (80) या वृद्ध महिलेचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केल्याचा प्रकार 19 डिसेंबर रोजी उघड झाला आहे. त्यांचा खून व्याजाच्या पैशावरुन झाल्याची गावात चर्चा सुरु आहे.

सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी सांगितले की, 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता लिंगेवाडी येथील घरात वृद्ध महिलेचे निधन झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून कर्मचारी पाठवून मृतदेह भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. त्यानंतर पंचनामा करून पार्वतीबाई शिंदे यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता गळा आवळण्याच्या खुणा दिसल्या. त्यानंतर आलेल्या रिपोर्ट मध्ये सदर महिलेचा गळा आवळून खून झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पार्वतीबाई यांना एक मुलगी आहे ती संभाजीनगर येथे राहाते तर सावत्र मुलगा गावातच वेगळा राहतो. त्या एकट्याच घरी राहत होत्या. त्यांचा खून कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहे. मात्र पार्वतीबाई यांचा खून हा व्याजाच्या पैशातून झाला असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.