
जालना येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील कंत्राटी संशोधक सहायक राहुल शंकर बनसोडे यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी 35 हजारांची लाच घेतांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज २५ सप्टेंबर रोजी कार्यालयात रंगेहाथ पकडले. राहुल शंकर बनसोडे रा. पंचशीलनगर, मोंढा नाका, छत्रपती संभाजीनगर असे संशोधक सहायकाचे नाव आहे.
तक्रारदार ओबीसी प्रवर्गातील असून त्यांचे दोन मुलांचे तेली जातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जात पडताळणी, समिती कार्यालय जालना येथे 8 ऑगस्ट 2022 रोजी अर्ज दिला होता. त्यावरुन अर्जात त्रुटी असल्याचे कारण सांगून कंत्राटी संशोधक सहायक राहुल बनसोडे याने त्यांचे दोन मुलांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना येथे तक्रार दिली. सदर तक्रारीवरुन 22 सप्टेंबर 2023 रोजी लाच मागणीबाबत पडताळणी केली असता आरोपी कंत्राटी संशोधक सहायक राहुल बनसोडे याने तक्रारदार यांचे मुलांचे तेली जातीचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वरिष्ठांचे नावाने पंचासमक्ष दोन्ही मुलांचे मिळून 40 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 35 हजार रुपये लाचेची मागणी करुन, लाचेची रक्कम स्वतः स्विकारणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन आज 25 सप्टेंबर रोजी सापळा लावला असता तक्रारदार यांच्याकडून त्यांचे मुलांचे तेली जातीचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपी राहुल बनसोडे यास तक्रारदार यांच्याकडून 35 हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारतांना जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना कार्यालयात अॅन्टी करप्शन ब्युरो जालनाचे पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
याप्रकरणी आरोपी राहुल बनसोडे याच्या विरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक किरण बिडवे यांच्यासह ज्ञानदेव जुंबड, गजानन घायवट, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, गणेश चेके, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, गजानन खरात, गजानन कांबळे, संदीपान लहाने, जावेद शेख, विठ्ठल कापसे, बिनोरकर यांनी केली आहे.






























































