
जळगाव महापालिकेवर शिवसेनेने भगवा फडकला आहे. भाजपचा धुव्वा उडवत शिवसेनेने महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवडून आणले आहे. इतकेच नाही तर शिवसेनेने उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांनाही निवडून आणले आहे. या निकालामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड दिल्याचे दिसून आले आहे. या विजयानंतर पर्यटनमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झालेल्या शिवसेनेच्या सौ. जयश्रीताई महाजन जी तसेच उपमहापौरपदी निवड झालेले श्री. कुलभूषण पाटील जी यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 18, 2021
शिवसेनेला या निवडणुकीमध्ये भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी मदत केली. ज्यामुळे शिवसेनेनं जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक शिवसेनेने जिंकल्याने सलग दुसरी महापालिका भाजपच्या हातातून गेली आहे. जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव केला. महाजन यांनी कापसे यांना तब्बल 15 मतांनी पराभूत केले. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत जयश्री महाजन यांना 45 मते मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना 35 मते मिळाली. गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे 27 नगरसेवक फुटले. ही बाब माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते. याशिवाय MIMच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या पारड्यात मते टाकली.
निवडणुकीला अवघे 5 दिवस शिल्लक असताना भाजपमध्ये उभी फूट पडल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. भाजपने निवडणुकीपूर्वी डॅमेज कंट्रोलसाठी सर्व शक्य प्रयत्न केले, मात्र त्याने फरक पडला नाही. शिवसेनेतर्फे महापौरपदासाठी जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदीासाठी कुलभूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे प्रतिभा कापसे आणि सुरेश सोनवणे यांना उमेदवारी दिली. गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून महापौर आणि उपमहापौर पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानिमित्त आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत होते. तर व्यासपीठावर आयुक्त सतीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
































































