
जालना येथून सळी घेऊन राजूर-भोकरदन मार्गे नंदुरबार येथे निघालेल्या ट्रकची चोरी करणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
26 एप्रिलला रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी कार आडवी घालून ट्रक थांबवला होता आणि चाकूचा धाक दाखवून ट्रक पळवून नेला होता. या प्रकरणी जालन्यातील हसमनाबाद पोलीस ठाण्यात अलीम बिसमिल्ला यांच्या (रा. सिंदखेडा, जि. धुळे) फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्ह्यात लुटलेल्या ट्रकसह दरोडेखोरांनी वापरलेली कार आणि इतर साहित्यासह साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून तपास सुरू होता. तपासादरम्यान ही चोरी दिनेश दत्तात्रय पवार याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी दिनेशसह शाहिद शकील शेख, तेजस नरेश बोडकर आणि सिद्दीकी शेख कौसर यांना अटक केली. त्यांनी पोलीस चौकशीमध्ये गुन्हा कबूल केला.
आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली होंडा सिटी कार, दोन धारदार चाकू, मिरची पुड, पेपर स्प्रे, 16 हजार 700 रुपये रोख, मोबाईल, दोन बनावट प्लेट व चोरलेला ट्रक असा एकूण 7 लाख 41 हजार 420 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चारही आरोपींना हसनाबाद पोलीस ठाण्याच्या पुढील तपास कामी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वैशाली पवार या करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चोडले, सॅम्युअल कॉवळे, गोकुळसिंग काटे, विनोद गडदे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुडे, सचिन चौधरी, फुलचंद गव्हाणे, प्रशांत लोखंडे, सुधीर वाघमारे, परमेश्वर धुमाळ, किशोर पुंगळे रवी जाधव, कैलास चेके, सचिन राऊत, योगेश सहाणे, चालक धम्मपाल सरडकर रमेश पैठणे यांनी केली आहे.



























































