
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथील येथील एका विवाहित महिला धुणे धुण्यासाठी विहिरीवर गेली असता विहिरीला कठडे नसल्याने विहिरीत पडून तिचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना 24 एप्रिल रोजी घडली आहे.
बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथील शितल संतोष बर्डे ही बावीस वर्षीय विवाहिता नित्याप्रमाणे घरातील धुणे धुण्यासाठी आज 24 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कचरू आनंदा बनसोडे यांच्या विहिरीवर गेली होती. सदरील विहीरीचे बांधकाम झालेले नसल्याने धुणे धुताना विहिरीत पडली.
ही बातमी गावकऱ्यांना समजताच मोठ्या संख्येने मदतकार्य करण्यात आले. तथापि, तोपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जवसगावचे सरपंच भरत गारखेडे यांनी दिली. या महिलेच्या पश्चात पती, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे. सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






























































