‘जनता कर्फ्यु’दरम्यानही शाहीन बाग येथील आंदोलन सुरू राहणार, आंदोलनकर्त्यांची माघार नाहीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात राजधानी दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरू असलेले महिलांचे आंदोलन संपायचे नाव नाही. दिल्लीमध्ये मोठी दंगल उसळल्यानंतर आणि आता कोरोना विषाणूबाधितांचा आकडा वाढत असतानाही येथील आंदोलनकर्त्या महिला माघार घेण्याच्या तयारीत नाही. कोरोनाचा वाढता धोका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले. नागरिकांनी सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान घरातून बाहेर पडू नये आणि जनता कर्फ्यु पाळावा असे आवाहन मोदींनी केले. मात्र जनता कर्फ्युच्या काळातही शाहीन बाग येथील आंदोलन सुरूच राहणार आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शाहीन बाग येथील महिला रविवारी देखील आपले आंदोलन सुरू ठेवणार आहेत. मोदींनी जनता कर्फ्युचे आवाहन करूनही महिला आपल्या आंदोलनावर ठाम आहे. दिल्लीला नोएडाशी जोडणाऱ्या रस्त्यावर या महिला डिसेंबर, 2019 पासून आंदोलन करत आहेत.

सोमवारी दिल्ली सरकारने लग्न आणि अंत्यसंस्कार या विधींना सोडून 50 पेक्षा जास्त लोकं एकत्र जमण्यास बंदी घातली आहे. नंतर हा आकडा 20 पर्यंत खाली आणण्यात आला. हा आदेश शाहीन बागला देखील लागू होणार आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. याबाबत आंदोलनकर्त्या महिलांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, एका वेळी 50 पेक्षा जास्त महिला आंदोलनात सहभागी होत नाही. तसेच जनता कर्फ्युदरम्यान आम्ही छोटे-छोटे गट करून टेंटमध्ये राहू, आणि दोन टेंट मधील अंतरही एक मीटर पेक्षा जास्त ठेऊ, असे एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

रिझवाना नावाच्या एका महिलेने सांगितले की, आंदोलनकर्त्या महिला खबरदारी बाळगत आहेत. सर्वच महिला बुरखा घालून आंदोलन करत आहेत. नियमित स्वरूपात हात साफ करत आहे. रोज पाच वेळा नमाज पढण्याची सवय असल्याने आम्ही हात-पाय पुन्हा पुन्हा धुतो, आणि याची आम्हाला सवय असल्याचे महिलेने म्हटले.