मोदींना अशुभ म्हणणाऱ्या कुमारस्वामींचा ‘जेडीएस’ पक्ष एनडीएमध्ये सामील

चांद्रयान-2 कोसळल्यानंतर बंगळुरूच्या ‘इस्रो’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अशुभ पाय पडल्यानेच मोहीम फसली, असे विधान करणाऱ्या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी एनडीएची वाट धरली आहे. आज शुक्रवारी कुमारस्वामी यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी जेडीएस एनडीएत सामिल होत असल्याची घोषणा करण्यात आली. कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाला होता. दक्षिणेकडील एकमेव राज्यही हातातून गेल्याने भाजपचे धाबे दणाणले होते.  त्यामुळेच भाजपने जेडीएसला सोबत घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीत जेडीएसला 4 जागा

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप कर्नाटकातील 28 जागांपैकी 4 जागा जेडीएसला देणार असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकात जेडीएसला मोठा जनाधार आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत जेडीएसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले होते, तर भाजपलाही 66 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला आव्हान देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.