
संयुक्त जनता दल (जेडीयू) ने 29 डिसेंबर रोजी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक आयोजित केली आहे. जेडीयूने सुरुवातीला केवळ राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली, परंतु नंतर राष्ट्रीय परिषदेची बैठकही आयोजित केल्याने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची तयारी केली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
ज्या ज्यावेळी जेडीयूने राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक आयोजित केली आहे त्या त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. त्यामुळे या बैठकीतही राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे. सध्या जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह हे आहेत. या बैठकीत जर राष्ट्रीय अध्यक्ष बदलले गेल्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे स्वतःकडे राष्ट्रीय अध्यक्षपद घेतील किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीकडे हे पद सोपवू शकतात. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. शनिवारी ललन सिंह यांना यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. जेडीयूच्या बैठकीत कोणते मुद्दे उपस्थित करायचे हेही आता तुम्हीच सांगा, असे ते म्हणाले. तसेच जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळही लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन चेहरा देण्याचा पक्षाचा प्रयत्न असू शकतो.
























































