
मुंबईतील क्रीडांगणे आणि उद्याने दत्तक देऊ नका अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. अशा प्रकारे पालिकेचे भूखंड दत्तक दिल्यास ते अतिक्रमण करून बळकावले जातात असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुंबईतील मनोरंजन मैदाने आणि क्रीडांगणे यांची देखभाल परवडत नसल्याने ती दत्तक तत्त्वावर देण्याचे धोरण महानगरपालिका आखत आहे. त्यासंदर्भात पालिकेने मुंबईकरांकडून हरकती व सूचनाही मागवल्या आहेत. परंतु अशा प्रकारे मोकळे भूखंड दत्तक दिल्यास त्यावर अन्य बांधकामे करून ते कालांतराने बळकावले जातात. त्यामुळे दत्तक देण्याचे धोरणच रद्द केले जावे, असे जयंत पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.
श्रीमंत महापालिकेला स्वतःच्या उद्यानांची चिंता का नाही?
मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. तिचा वार्षिक अर्थसंकल्पच 52 हजार कोटी रुपयांचा आहे. इतक्या श्रीमंत महापालिकेला स्वतःची उद्याने आणि भूखंडांची देखभाल करणे शक्य होऊ नये ही बाब निश्चितच भूषणावह नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला टोलाही लगावला आहे.
व्यायामशाळांच्या निमित्ताने पालिकेच्या भूखंडांवर अतिक्रमणे
मुंबई हे दाट लोकवस्तीचे शहर आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनोरंजनासाठी अधिकाधिक सार्वजनिक मोकळय़ा जागा उपलब्ध करून देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. यापूर्वीही पालिका प्रशासनाने काही खासगी व्यक्तींना भूखंड दत्तक दिले होते, मात्र त्या जागांवर त्या व्यक्तींनी व्यायामशाळा व इतर बांधकामे करून अतिक्रमण केले असल्याची बाब जयंत पाटील यांनी या पत्रात निदर्शनास आणून दिली आहे. अतिक्रमण करणाऱयांनी तर काही ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदीही केली होती, इतकेच नव्हे तर ते भूखंड परत घेणे महापालिकेला अजूनही शक्य झालेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.






























































