जेईई परीक्षा  वेळापत्रकानुसारच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. शैक्षणिक धोरण चांगले नसले तरीही न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये, असा निकाल सर्वेच्च न्यायालयाने याआधी दिला आहे. त्या निकालाचा संदर्भ देत प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जेईई  परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार होणार आहे.

24 ते 31 जानेवारी या कालावधीत जेईई मेन परीक्षा होणार आहे. याचदरम्यान प्री-बोर्ड आणि प्रॅक्टिकल परीक्षा होणार असल्यामुळे जेईई मेन परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करीत बाल हक्क कार्यकर्त्या अनुभा सहाय यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.