
इस्रायलमधील बहुमताचा राजकीय पेच काही सुटायला तयार नाही. गेल्या दोन वर्षांत तिथे चार संसदीय निवडणुका झाल्या, पण कुठल्याच पक्षाला इस्रायली जनतेने स्पष्ट बहुमत दिलेले नाही. मंगळवारी यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीची 90 टक्के मतमोजणी पूर्ण झालीय, पण अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला देशात सरकार स्थापन करता येईल इतके बहुमत मिळालेले नाही. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या लिकुड पार्टीला सर्वाधिक 30 जागा मिळवता आल्या आहेत. पण 61 या बहुमताच्या जादुई आकड्यांपासून मात्र नेत्यानाहू यांचा पक्ष बराच दूर आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये पुन्हा मोठा राजकीय पेच उभा राहिला असून पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इस्रायली संसदेतील खासदारांची एकूण संख्या 120 आहे. त्यामुळे बहुमताची संख्या गाठणे हे सर्व राजकीय पक्षांसमोरचे मोठे आव्हान ठरले आहे.


























































