तणावात आहोत, तीन महिन्यांपासून पगार नाही- जेटच्या कर्मचाऱ्यांचे प्रभूंना साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

एअर इंडीया नंतर जेट एअरवेज ही विमान कंपनी  आर्थिक डबघाईस आली आहे. याचदरम्यान, कंपनीच्या विमानांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या इंजिनिअर्सच्या संघटनेने नागरि उड्डाण मंत्रालयाला पत्र लिहले आहे. तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने तणावात असून विमान उड्डाण सेवाच धोक्यात आल्याचा इशारा यात देण्यात आला आहे. तसेच याप्रकरणाची डीजीसीएने दखल घ्यावी अशी विनंतीही या संघटनेने पत्रात केली आहे. दरम्यान, नागरि उड्डाण मंत्री सुरेश प्रभु यांनी या पत्राची गंभीर दखल घेतली असून संबंधित विभागाची ताबडतोब बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.

जेट एअरवेजच्या इंजिनिअर्स वेलफेअर असोसिएशनने (जेएएमईडब्ल्यूए) हे पत्र लिहले आहे. यात इंजिनिअर्सना पगार वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक गरजा भागवणे कठीण झाल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे विमानांचे व्यवस्थापन पाहणारे इंजिनिअर्स तणावात असून याचा परिणाम त्यांच्या कामावर होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. गेल्या सात महिन्यांपासून पगार अनियमित मिळत असल्याची तक्रार यात करण्यात आली आहे. तसेच आम्ही विमानांची दुरुस्ती करतो. विमान उड्डाण करण्यास योग्य आहे की नाही ते ठरवतो. पण सध्या तणावामुळे कामावर परिणाम होत असल्याचं सांगत इंजिनिअर्सनी आपल्या व्यथाच पत्रात मांडल्या आहेत.