Jiah Khan suicide case अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या मृत्यूप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेता अभिनेता सूरज पांचोली (Sooraj Pancholi) याची निर्दोष मुक्तता केली. जियाला तिचा प्रियकर सूरज पांचोलीने आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जियाची आई राबिया खान यांनी हा आरोप केला होता. मात्र न्यायालयाने पुरावे नसल्याने हा आरोप फेटाळून लावला.

न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूकडील अंतिम युक्तिवाद ऐकून घेतले आणि निकाल राखून ठेवला होता. आज या खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला असून सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जियाचा मृत्यू होऊन जवळपास 10 वर्षे उलटल्यानंतर विशेष न्यायालयाने खटल्याचा निकाल दिला आहे.

 काय आहे प्रकरण?

मूळ अमेरिकेची नागरिक असलेली जिया ही जुहू येथील राहत्या घरी 3 जून 2013 रोजी मृतावस्थेत आढळली होती. अधिक तपासात जियाच्या घरी तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. त्याआधारे पोलिसांनी जियाचा प्रियकर सूरज पांचोलीला अटक केली होती. जवळपास एक महिना तो तुरुंगात होता.

1 जुलै 2013 रोजी सूरज पंचोलीला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तपासावर जियाची आई राबिया खान समाधानी नव्हत्या आणि त्यांनी हे प्रकरण आत्महत्येचे नसून हत्येचे आहे, असा दावा न्यायालयात केला होता.

2014 मध्ये जियाच्या आईने केलेल्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे दिली होती. 2015 मध्ये सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून सूरज पांचोलीच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306 अंतर्गत सूरज पांचोलीवर आरोप निश्चित करण्यात आले होते. 2021 मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाकडे हा खटला वर्ग केला गेला.