
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि बीपीची इंधन व मोबिलिटी संयुक्त भागिदारी रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (आरबीएमएल) यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील नवी मुंबईतील नावडे येथे पहिले जिओ-बीपी ब्रँडेड मोबिलिटी स्टेशन लाँच केले आहे. आव्हानात्मक बाह्य वातावरणात काम करत जिओ- बीपी जागतिक दर्जाचे मोबिलिटी नेटवर्क तयार करत असून त्याद्वारे ग्राहकांना इंधनाचे विविध पर्याय मिळतील. देशातील मोबिलिटी सोल्यूशन्सचे चित्र बदलत जिओ-बीपी ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या कार्यरत असलेल्या तब्बल 1400 इंधन स्टेशन्सचे येत्या काही महिन्यांत जिओ- बीपीमध्ये पुन्हा ब्रँडिंग केले जाईल आणि ग्राहकांना चांगली सेवा दिली जाईल.
देशातील इंधन आणि मोबिलिटी बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. पुढील 20 वर्षांत भारतीय बाजारपेठ जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी इंधन बाजारपेठ बनेल असा अंदाज आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत करण्याच्या अनुषंगाने जिओ- बीपी मोबिलिटी स्टेशन्स तयार करण्यात आली असून ग्राहकांच्या सोयीनुसार वसवण्यात आली आहे. या स्टेशन्सद्वारे ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा जलद पुरवल्या जातील. त्यामध्ये एडिटिव्हाइज्ड इंधन, ईव्ही चार्जिंग, खानपान सेवा आणि कालांतराने कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या सुविधांचा समावेश आहे.
ही संयुक्त भागिदारी इंधन आणि मोबिलिटी क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून त्यासाठी रिलायन्सचा विस्तारित अस्तित्व, जिओ आणि रिलायन्स रिटेलमधील लाखो ग्राहकांसह देशातील ग्राहक व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव आणि बीपीचा दर्जेदार, वेगळे इंधन, ल्युब्रिकंट्स, रिटेल आणि आधुनिक कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या मोबिलिटी सोल्यूशन्स क्षेत्रातील विस्तृत जागतिक अनुभवाचा उपयोग केला जाईल.
ग्राहकांची सोय व्हावी यासाठी वाइल्ड बीन कॅफेच्या माध्यमातून प्रवासात असलेल्या ग्राहकांना खानपान सेवा दिली जाणार आहे. 24×7 शॉपकडे देशातील सर्वात मोठी रिटेलर रिलायन्स रिटेल भागीदार म्हणून सोबत असून त्याद्वारे दैनंदिन गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणि मिठाई उपलब्ध केल्या जातील. जिओ-बीपीद्वारे आपल्या मोबिलिटी स्टेशन्सवर कॅस्ट्रॉलसह भागिदारीत एक्सप्रेस ऑइल चेंज दालनांचे नेटवर्क सुरू केले जाईल. हे नेटवर्क व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित तज्ज्ञांद्वारे वाहनाची मोफत तपासणी आणि मोफत ऑइल- चेंज सेवा देईल.
या नव्या सेवांशिवाय जिओ-बीपी संपूर्ण स्वयचंलित सेवा ‘दर्जा आणि संख्ये’च्या खात्रीसह पुरवली जाणार असून पर्यायाने ग्राहकांना जिओ-बीपी मोबिलिटी स्टेशन्सवर खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचे पूर्ण मूल्य मिळेल. ग्राहकांना दर्जेदार सेवा दिल्या जाणार असून त्यात आकर्षक किंमती, तत्काळ सवलती, हॅपी अवर योजना, संपूर्ण नेटवर्कमध्ये समान आणि लवचिक डिजिटल पेमेंट सुविधा यांचा समावेश असेल.

























































