कालपर्यंत विठ्ठल असलेले शरद पवार अचानक हुकूमशहा कसे झाले? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कालपर्यंत ज्यांना तुम्ही विठ्ठल मानत होता ते हुकूमशहा कसे झाले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केला.आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत शरद पवार यांच्याबाबत अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांना उत्तर दिलं. यावेळी ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.

पत्रकार परिषदेत आव्हाड म्हणाले की, मी कालपर्यंत एका गोष्टीवर विश्वास ठेवत होतो की या सगळ्यांचं दैवत शरद पवार आहेत. पण, शरद पवार यांना हुकूमशहा म्हटलं गेलं. ते पक्षात कधीही तसं वागले नाहीत. हा आरोप करणाऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. काल पर्यंत जे लोक शरद पवार यांना विठ्ठल म्हणत होते, ते आमचं दैवत आहेत असं म्हणायचे, ते लोक त्यांना हुकूमशहा कसं म्हणू शकले, ते लोकशाही न मानणारे आहेत? असं कसं म्हणू शकले, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

शरद पवार स्वत: दोन तास निवडणूक आयोगात बसून होते, सुनावणी ऐकत होते. ते बोलून दाखवत नसतील पण त्यांना भावनिक हल्ला झाल्यासारखं वाटलं, असं आव्हाड म्हणाले. ज्या माणसाने आयुष्यभर लोकशाही मूल्यांचा आदर केला. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एक तासही त्या घरात राहिले नाहीत. पक्ष स्थापन केल्यानंतर जे लोक साडे अठरा वर्ष मंत्री राहिले तेच लोक आता म्हणतात शरद पवारांनी पक्षात लोकशाही ठेवली नाही, एकाधिराशाहीसारखे वागले म्हणतात, असंही आव्हाड यांनी म्हटलं.