जेएनपीटीत दक्षता सप्ताह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मधुकर ठाकूर । उरण

जेएनपीटीने केंद्रीय सतर्कता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार भ्रष्टाचार निर्मूलन करणे व नवीन हिंदुस्थान निर्माण करणे या संकल्पनेनुसार दक्षता सप्ताह साजरा केला. सप्ताहाच्या सुरुवातीलाच जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला शपथ दिली.

दक्षता सप्ताहाच्या दरम्यान जेएनपीटीने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. ज्यामध्ये निबंध स्पर्धा, घोष वाक्य लिहिणे, पोस्टर्स स्पर्धा, भाषण, पोर्ट यूजरसाठी चर्चात्मक शिबीर, तसेच भ्रष्टाचार निर्मूलन करणे व नवीन हिंदुस्थान निर्माण करणे या संकल्पनेला पाठींबा देण्यासाठी प्रतिबंधात्मक भ्रष्टाचार या विषयावर कार्यशाळेचे आयोजन जेएनपीटीचे कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते.

भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी व प्रामाणिकपणाचा संदेश देण्यासाठी जेएनपीटीने पथनाट्याचेही आयोजन केले होते. दक्षता सप्ताहाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अनेक कॉलेजमध्ये कार्टून स्पर्धां घेण्यात आल्या. तसेच व्हिजिलन्स स्टडी सर्कल मुंबई चाप्टरने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नाबार्ड येथे आयोजित केलेल्या वॉकेथॉन मध्ये सहभाग नोंदवला.

अनिल रामटेके, आयआरएसएस व मुख्य सतर्कता अधिकारी यांनी नैतिक आचरण माध्यमातून यश या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणात्मक कार्यक्रम घेतला ज्यामध्ये त्यांनी मुलांच्या भविष्यातील करिअर संबंधित अनेक विषयावर मार्गदर्शन केले.

दक्षता सप्ताहाच्या समारोपाला विविध स्पर्धात विजेत्या ठरलेल्या जेएनपीटीच्या कर्मचाऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले कि शासनाचा एक भाग म्हणून भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण करणे व उच्चतम दर्जाची सेवा देणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच सतर्कता विभागाने संस्थेतील कुठल्याही पातळीवर भ्रष्टाचार टाळण्यासाठी लोकांना शिक्षित करणे गरजेचे असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडून कामाच्या ठिकाणी आनंद निर्माण करावा असे त्यांनी नमूद केले.

दक्षता जागरूकता सप्ताह जेएनपीटीचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी तसेच इतर कॉलेजचे विदयार्थी सहभागी झाले होते.