जेएनयूमध्ये खोडसाळपणा; सावरकरांच्या नावावर काळे फासले, बाबासाहेबांचे नाव लिहून जिन्नांचा फोटो लावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेएनयू कॅम्पसमधील ‘विनायक दामोदर सावरकर मार्ग’ या बोर्डावर खोडसाळपणा करत अज्ञातांनी काळे फासले आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला असून या विरोधात संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. कॅम्पसमधील बोर्डावर असणाऱ्या वीर सावरकरांच्या नावावर काळ लावल्यानंतर समाजकंटकांनी त्या बोर्डावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव लिहिले. तसेच मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटोही तिथे लावण्यात आला.

गेल्या काही महिन्यात जेएनयूचे नाव कायमच गाजत राहिले आहे. देशविरोधी घोषणा असो अथवा कॅम्पसमधील राडा, यामुळे जेएनयूवर टीकाही झाली. यातून सावरत जेएनयू प्रशासनानेे काही दिवसांपूर्वी कॅम्पसमधील एका रस्त्याला वीर सावरकरांचे नाव दिले. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयावरडाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयुशी घोषनेही या निर्णयावर टीका केली.

दरम्यान, जेएनयू प्रशासनाने ज्या रस्त्याचे नाव ‘विनायक दामोदर सावरकर मार्ग’ असे ठेवले, त्याच रस्त्याच्या साइन बोर्डावर अज्ञातांनी सोमवारी रात्री काळा रंग फासला आणि त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव लिहिले. तसेच साइन बोर्डावर जिन्नांचा फोटो चिकटवला. या प्रकरणी अद्याप कोणाचा सहभाग आहे हे उघड झालेले नाही, तसेच कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.