
>> मानसी पिंगळे
अभिनेत्री स्मिता तांबे गेली कित्येक वर्षे तिच्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय. जोगवा, 72 मैल एक प्रवास, तुकाराम, देऊळ, नातीगोती त्याचबरोबर बॉलीवूडमधील पंगा, सिंघम रिटर्नस, जवान अशा अनेक चित्रपटांतच नव्हे, तर मालिका, वेब सीरिजमध्येसुद्धा तिने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळवली. या मराठमोळ्या अभिनेत्रीला 8 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या, ‘जोरम’ चित्रपटातील भूमिकेसाठी स्टार्स आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये आशियातील ‘सर्वोत्तम अभिनेत्री’ असे जागतिक स्तरावर गौरविण्यात आले. हा पुरस्कार एका कोरियन अभिनेत्रीसह स्मिताला विभागून देण्यात आला. देवाशीष मखीजा दिग्दर्शित, ‘जोरम’ या चित्रपटालासुद्धा आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये, ‘बेस्ट ज्युरी’ हा पुरस्कार मिळाला असून, जगभरातील चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींकडून सिनेमासह स्मिताच्या अभिनयाचे कौतुक केले गेले.
पुरस्कार स्वीकारताना स्मिता भारावून गेली. ‘मी स्मिता, ऍक्ट्रेस फ्रॉम इंडिया’ हे उच्चारताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. संपूर्ण आशिया खंडातील चित्रपटांमधून आपली निवड होणं हे माझ्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतंय आणि हीच मझ्या कामाची पोचपावती. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘जोरम’ चित्रपट पाहताना फार गर्व वाटत होता. स्वतःवरही आणि संपूर्ण जोरम टिमवरही, असे स्मिता म्हणाली.
खडतर प्रवास…
‘जोरम’ चित्रपटात स्मिताने झारखंड, ओडिशामधील आदिवासी भागात जाऊन शूटिंग केले. त्यावेळी तिची मुलगी केवळ तीन महिन्यांची होती. पण तरीही तिने शूटिंगदरम्यान टाळाटाळ केली नाही. दिग्दर्शक आणि निर्माते यांनीदेखील तिला सहकार्य केले. मनोज वाजपेयीसारख्या दिग्गज कलाकाराचीही मदत झाली. जवळपास 28 दिवस शूटिंग सुरू असताना स्मितासोबत तिची आई, मुलगी आणि पतीसुद्धा होते.
अशी साकारली फुलो कर्मा
या भूमिकेसाठी स्मिताने खूप मेहनत घेतली. स्मिताने झारखंडमध्ये बोलल्या जाणाऱया भाषेवर, ती साकारत असलेल्या भूमिकेतील पेहरावावर, चालण्या- बोलण्याच्या पद्धतीवर जवळ्पास 3 महिने अभ्यास केला आणि त्यांनतर साकारली गेली फुलो कर्मा. ‘जोरम’ मध्ये ‘फुलो कर्मा’ ही भूमिका स्मिताने साकारली. यादरम्यान स्मिता एकाच वेळी दोन मिशन हाताळत होती. एक खऱयाखुऱया आयुष्यातील आई आणि दुसरी, फुलो कर्मा ही भूमिका.





























































