ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडची आयपीएलमधून माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका क्रिकेटपटूने आयपीएलमधून माघार घेतली आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने कुटुंबासोबत वेळ घालवता यावा यासाठी 9 एप्रिलपासून हिंदुस्थानात खेळवण्यात येणाऱया टी-20 स्पर्धेमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मात्र महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला धक्का बसला आहे. आयपीएलमधून माघार घेणारा जोश हेझलवूड हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी मिचेल मार्श व जोश फिलीप या दोन खेळाडूंनीही आयपीएलमधून ‘बॅक आऊट’ केले आहे.

ऑस्ट्रेलियन संघ पुढील 12 महिन्यांमध्ये महत्त्वाचे दौरै करणार आहे. या दौऱयांकरिता फिट राहता यावे यासाठी जोश हेझलवूड याने हा निर्णय घेतला असल्याचे त्याच्याकडून यावेळी सांगण्यात आले. यावेळी तो म्हणाला, काही दिवसांनंतर वेस्ट इंडीजचा प्रदीर्घ दौरा असणार आहे. त्यानंतर टी-20 मालिका खेळण्यासाठी बांगलादेशात जावे लागणार आहे. हिंदुस्थानात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत मानसिकदृष्टय़ा फिट असणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे तो पुढे म्हणाला.