पत्रकार मधू कांबळे यांच्या ‘समतेशी करार’ पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांनी जे सामाजिक समतेचे विचार मांडले ते आजही आपल्या सोबतच आहेत. फक्त त्यांनी आपल्याला सामाजिक समतेचे हे देणं दिले आहे हे आपण विसरतो आहोत. या विचारधारेला पुढे नेताना जातपातविरहित आणि माणूस म्हणून सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार ‘समतेशी करार’ पुस्तकातून मांडला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांच्या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी केले.

मधू कांबळे यांच्या ‘समतेशी करार’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरूवारी  झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 75 वर्षे पूर्ण केल्यानंतर स्वातंत्र्याचे किरण आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवू शकलो का याचा विचार करण्याची गरज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर याच भूमिकेतून संघर्ष केला. सामाजिक समानतेसाठी कृतिशील लढा दिला. आपण मूलतः माणूस आहोत. त्यानंतर आपल्याला जातपात आणि धर्म चिकटतो. ते मिरकताना आपण ज्या गोष्टी जपतो त्या बरोबर आहेत की चुकीच्या असा मनात जेव्हा संभ्रम निर्माण होतो त्यावेळी ज्या गोष्टी आपल्याला मार्ग दाखवतात त्यात हे पुस्तक वाटाडय़ाचे काम करील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ही निश्चित कौतुकाची आणि धाडसी बाब असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याकेळी राजकुमार सागर, गौतमीपुत्र कांबळे, सुहासिनी कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.