
जुन्नर शिवनेरी येथील आळेफाटा गावचे उमेश देवकर यांनी पाच वर्षांपूर्वी मुंबईतील सोसायटय़ांमध्ये भाज्यांचे स्टॉल लावून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायला सुरुवात केली होती. त्यांच्या ताज्या, स्वच्छ भाज्यांनी मुंबईकर ग्राहक खूश झाले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत त्यांच्या व्यवसायाने झेप घेतली. व्हॉट्सअपवरून फळभाज्यांची ऑर्डर घेत त्यांनी थेट वेबसाईटच्या माध्यमातून फळ, भाज्यांची घरपोच विक्री सुरू केली. आज ते केवळ भाज्याच नव्हे तर 170 हून उत्पादने घरपोच देत आहेत.
शेतकरी कुटुंबातील उमेश देवकर यांनी मेकॅनिकल इंजिनियरींगचे शिक्षण घेतले आहे. देवकर यांनी सुरुवातीची तीन वर्षे मार्केटींगची नोकरी केली. पुढे त्यांनी ट्रान्सपोर्टच्या क्षेत्रात काम केले. त्याचवेळी शेती करणेही सुरू ठेवले. 2017 साली महाराष्ट्रात अडत्यांनी संप पुकारला, त्यावेळी मुंबईत भाजीपाला मिळेनासा झाला. तेव्हा उमेश देवकर यांनी आपल्या शेतात पिकलेला टॉमेटो, कोबी आणि अन्य भाजीपाला घेऊन भांडुप गाठले. तिथे त्यांनी भाज्यांचा स्टॉल लावला. पुढे मुलुंड, सायन, वडाळा या भागांत त्यांनी किरकोळ भाजी विक्री सुरू केली. सोसायटय़ांच्या आवारात स्टॉल लावून ते भाजी विकू लागले. त्यांच्या शेतातील ताजा, स्वच्छ भाजीपाला ग्राहकांच्या पसंतीला उतरला. देवकर यांनी व्हॉट्सऍपवरून ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. होम डिलिव्हरीवर लक्ष केंद्रीत केले. eJedruedshedaJed.comed ही वेबसाईट सुरू केली. फार्म फेस्ट ही कंपनी सुरू केली.
उमेश देवकर यांच्या घरपोच सेवेवर ग्राहक खूश
n सद्यस्थितीत देवकर यांच्या शेतातील भाज्या आणि आजूबाज्च्या 50 शेतकऱयांच्या शेतात पिकलेला माल वेबसाईटद्वारे ग्राहकांना उपलब्ध होत आहे. ठाणे ते दादर या भागात ते घरपोच डिलिव्हरी करतात. त्यांची 35 जणांची टीम आहे. त्यासाठी कमीत कमी 400 रुपयांपर्यंतची ऑर्डर हवी. सध्या भाज्या फळं, पिकं, धान्य डाळी, कडधान्य, स्थानिक मसाले, लाकडी घाण्याची तेलं अशी 170 हून अधिक उत्पादने विक्रीला आहेत.
शेतातून थेट घरात
शेतातून भाज्या थेट पॅक हाऊसमध्ये येतात. आम्ही त्यांना निवडून ग्राहकांपर्यंत पोचवतो. त्यांना पाणी मारत नाही. कारण पाण्यामुळे त्या सडतात. आम्ही भाज्यांच्या पिशव्या देतो. त्या पिशव्या फ्रिजमध्ये ठेवता येतात. भाज्या सात- आठ दिवस तशाच राहतात. ताजा टवटवीत भाजीपाला योग्य दरात आम्ही ग्राहकांना देतो. दर्जेदार माल प्रत्येक कुटुंबाला योग्य किंमतीत घरपोच देणे, हा आमचा उद्देश असल्याचे उमेश देवकर यांनी सांगितले.




























































