रानफुले बहरू लागली; ‘कास’ला अनलॉकची प्रतिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाचगणी, दि. 17 (सा. वा.) –

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षीपासून लॉकडाऊनमध्ये असलेली ‘कास’ची रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेला यंदा अनलॉक प्रतीक्षेत आहे. पावसाच्या उघडझापमुळे रानफुले बहरू लागली असून, त्यांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे. यंदा कासचा लॉकडाऊन उठणार का, याची प्रतीक्षा निसर्गप्रेमी व स्थानिक व्यावसायिकांना आहे.

नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांची उधळण होऊन अनोख्या आविष्काराने सजणारे दरवर्षी लाखो पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणाऱया कास पुष्प पठारावरील फुलांच्या कळ्या उमलण्यास सुरुवात होऊ लागली आहे. पठारावरील निसर्ग हंगामासाठी सज्ज होताना दिसत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षापासून पर्यटनावर बंदी असल्याने गेल्या वर्षीचा कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करता आला नाही. त्यामुळे संयुक्त व्यवस्थापन समितीला कोटय़वधीच्या उत्पन्नाचा फटका बसला. परिसरातील व्यवसायिकांचे धंदे थांबले. पर्यटकांनाही निसर्गाचा आनंद लुटत आला नाही. त्यामुळे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे घरात कोंडलेले पर्यटक, पर्यटनावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यावसायिक, कामगारांसह संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून प्रशासनाने नियमावली बनवून पंधरा ते वीस दिवसांवर येऊन ठेपलेला व दोन महिने चालणारा कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.

पावसाच्या उघडझापने रानफुले बहरू लागली….

या भागात मोठी अतिवृष्टी झाली असून, श्रावणातल्या उघडझापने नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये रानहळदीच्या पांढऱया रंगाची फुले मोठय़ा प्रमाणात बहरली आहेत. तेरडा, गेंद, रानगवर, सोनकी, आम्री, नीलिमा, कापरू, टूथब्रश, आबोलिमा आदींसह अनेक शेकडो जाती-प्रजातीच्या फुलांच्या कळ्या तयार होऊ लागल्याचे दिसत आहे. त्यातच मुसळधार पावसाने उघडीप दिली असल्याने ऊन-पावसाच्या खेळामुळे सप्टेंबरच्या प्रारंभीलाच पठारावर फुलांचे गालिचे तयार होऊन निसर्गाचा अनमोल नजराणा पाहायला मिळणार आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट अद्याप खाली आलेला नाही, कोठेही पर्यटनाला परवानगी नाही. कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाल्यास आणि जिल्हाधिकाऱयांनी नियमांत शिथिलता दिल्यास पर्यटकांच्या गर्दीचा विचार करून कास पठारच्या हंगामाचा विचार केला जाईल. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. – महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, सातारा

आगामी 15 ते 20 दिवसांत फुलांच्या बहराला प्रारंभ होईल. पर्यटकांना फुले पाहण्यासाठी पठार खुले करून हंगाम चालू करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना वनविभागाकडून आलेल्या नाहीत. मात्र, कोरोनाची नियमावली करून दररोज ऑनलाइन परवानगीने ठराविक पर्यटकांसाठी पठार सुरू करण्यास परवानगी दिल्यास आम्ही नियमांची अंमलबजावणी करून हंगाम पार पाडू. – सोमनाथ जाधव, सदस्य, संयुक्त व्यवस्थापन समिती.