
बाळ तोरसकर
कबड्डी हा मनोबल वाढवणारा खेळ… त्याचबरोबर संघभावनाही जोपासली जाते…
मागील लेखात आपण कबड्डी या खेळाची माहिती करून घेतली होती. त्याचबाबत पुढे जाणून घेऊया. प्रो-कबड्डी लीगमुळे आजकाल कबड्डी इमारतींच्या आवारात, मैदानांमध्ये, समुद्रकिनारीसुद्धा खेळली जाऊ लागली आहे. घराघरात सीरियलऐवजी प्रो-कबड्डी पाहण्याला महत्त्व आले आहे. या खेळाला ऑलिम्पिकची आस लागली आहे. या खेळातील क्रीडा कार्यकर्त्यांनी या खेळाचे महत्त्व ओळखून व क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगला हिंदुस्थानात मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून प्रो-कबड्डी लीग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली व ती यशस्वीसुद्धा झाली. यासाठी मतभेद बाजूला सारून सर्वांना एकत्र यावे लागले व त्यासाठी पुढाकारी घ्यावा लागला. तर चला पाहूया खेळाचे नियम व बारकावे.
पूर्वी खुल्या मैदानात खेळली जाणारी कबड्डी आता मात्र बंदिस्त मैदानात व मॅटवरसुद्धा खेळली जाऊ लागली आहे. त्यामुळेच या खेळाला एक वेगळे ग्लॅमर तर मिळाले आहेच, पण त्याची लोकप्रियताही शिगेला पोहचली आहे. वेगवेगळ्या देशांतील खेळाडू या प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळत असल्याने व त्याची लोकप्रियता वाढल्याने हा खेळ विविध देशांत पाहिला जात आहे व खेळलासुद्धा जात आहे.
या खेळात एका संघात 12 खेळाडू असतात, मात्र प्रत्यक्ष मैदानात सात खेळाडूच खेळताना दिसतात. उरलेले पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून आपली भूमिका बजावत असतात. यात मैदानावर कबड्डी घालणाऱया संघाच्या खेळाडूस आक्रमक/चढाई असे म्हटले जाते तर प्रतिस्पर्धी संघाच्या संघास संरक्षक म्हटले जाते. चढाई करणाऱया खेळाडूने मध्यरेषा ओलांडण्यापूर्वीपासून कबड्डी-कबड्डी असा उच्चार करणे महत्त्वाचे आहे. जर एखाद्या खेळाडू असा उच्चार करत नसेल तर पंच त्यास कबड्डी घालण्यापासून रोखतात व प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला कबड्डी घालण्याची संधी दिली जाते. खेळ चालू असताना खेळाडूचा कोणताही शरीराचा भाग अंतिम रेषेच्या बाहेर गेल्यास तो खेळाडू बाद दिला जातो, मात्र जर पक्कड करताना असा खेळाडू अंतिम रेषेच्या बाहेर गेला, मात्र त्याच्या शरीराचा कोणताही भाग अंतिम रेषेच्या आत असेल तर मात्र तो खेळाडू बाद दिला जात नाही. जर खेळ चालू असेल व एखाद्या खेळाडू अंतिम रेषेच्या बाहेर गेल्याचे निदर्शनास आल्यास पंच त्या खेळाडूला बाहेर काढतात. चढाई करणारा खेळाडू चढाई झाल्यावर परत गेल्यावर किंवा बाद झाल्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूने पाच सेकंदांत चढाई करावी असा संकेत आहेत. कबड्डी खेळताना एखाद्या संघातील सर्व खेळाडू बाद झाले तर त्याला प्रतिस्पर्धी संघाने लोन चढवला असे म्हणतात व त्यांना बाद झालेल्या खेळाडूंच्या व्यतिरिक्त दोन लोन गुण मिळतात. या खेळात जर आपला खेळाडू बाद झाला असेल व तो बाहेर असेल तर चढाई केल्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला बाद केल्यावर आपला बाहेर बसलेला खेळाडू आत येतो. त्यामुळे चढाई करणाऱया संघाची ताकद मात्र नक्कीच वाढते. खेळाडूने चढाई केल्यावर झटापट झाली व आपल्या अंगणात येताना तो राखीव क्षेत्राचासुद्धा उपयोग करू शकतो. चढाई करणाऱया खेळाडूने चढाई केल्यापसून तो परत आपल्या अंगणात येईपर्यंत प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू मध्य रेषा ओलांडू शकत नाही. तसे आढळल्यास अशा प्रतिस्पर्धी खेळाडूला पंच बाद देतात.
कबड्डी हा सांघिक खेळ असला तरीही काही खेळाडू आपल्या कामगिरीच्या जोरावर सामन्यावर वेगळा ठसा उमटवून जातात व आपला नावलौकिक मिळवतात. पुरुष संघाचा सामना 20-20 मिनिटांचा असतो तर महिलांचा सामना 15-15 मिनिटांचा असतो. दोन डावांच्या मध्ये पाच मिनिटांची विश्रांती दिली जाते. जर सामना समान गुणात संपला तर मात्र पुन्हा पाच मिनिटांचा डाव खेळवला जातो. पहिला डाव संपल्यावर दोन्ही संघांना आपापले अंगण बदलावे लागते. संघातील प्रत्येक बाद झालेल्या खेळाडूच्या बदल्यात प्रतिस्पर्धी संघाला एक गुण दिला जातो. चढाई करणाऱया खेळाडूने निदान रेषा पार करणे आवश्यक असते. बोनस रेषा ओलांडल्यास चढाई करणाऱया खेळाडूला एक बोनस गुण व त्याने बाद केलेल्या प्रत्येक खेळाडूबद्दल एक-एक गुण दिले जातात. सामन्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पंचप्रमुख, दोन पंच, एक गुणलेखक व दोन सहाय्यक गुणलेखक असतात.
























































