Kaali चित्रपटाच्या पोस्टरवर ‘काली’ मातेला सिगारेट ओढताना दाखवले, संतापाच्या उद्रेकानंतर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या माहितीपटातील पोस्टवर अखंड हिंदुस्थानचे दैवत असणाऱ्या काली मातेला सिगारेट ओढताना दाखवण्यात आले असून एका हातात एलजीबीटी समुदायाचा झेंडाही दाखवण्यात आला आहे. यामुळे सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला असून माहितीपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शक लीना मणिमेकलई यांना अटकेची मागणी होत आहे. हे प्रकरण आता पोलीस स्थानकापर्यंत पोहोचले असून दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘काली’ माहितीपटाच्या पोस्टरविरोधात सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाद वाढत असल्याचे पाहून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ यूनिटने तत्काळ कारवाई करत माहितीपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शक लीना मणिमेकलई यांच्याविरोधात कलम 153ए आणि 295 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हिंदू देवदेवतांचे अपमानास्पद चित्रिकरण केल्याप्रकरणी ‘काली’ माहितीपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शक लीना मणिमेकलई यांच्याविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील एफआयआर दाखल केली आहे. हिंदू देवदेवतांचे आपत्तीजनक चित्रिकरण, धार्मिक भाडका भडकावणे आणि शांतता भंग करण्याच्या आरोपांखाली लीना मणिमेकलई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

‘काली’ माहितीपटाचे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले. या पोस्टरवर काली माता सिगारेट ओढताना दाखवली आहे. याशिवाय तिच्या एका हातामधे त्रिशूळ आहे तर दुसऱ्या हातामध्ये एलजीबीटी समुदायाचा सप्तरंगी झेंडा दाखवला आहे. यावरून मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर #arrestleenamaninekalai ट्रेंड झाला. लीना मणिमेकलई यांनी माफी मागावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणीही होत आहे.

वादावर काय म्हणाल्या निर्मात्या?

दरम्यान, चित्रपटाच्या पोस्टवरून वाद भडकलेला पाहून निर्मात्या, दिग्दर्शक लीना मणिमेकलई यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. हा माहितीपट कॅनडा फिल्म फेस्टिव्हल (Rhythms of Canada) मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रतिसाद कसा मिळतो याची उत्सुकता आहे. परंतु जेव्हा हे पोस्टर समोर आले तेव्हा मात्र प्रेक्षकांनी ते सपशेल नाकारले. तसेच पोस्टर पाहिल्यानंतर #arrestleenamaninekalai ऐवजी #loveyouleenamaninekalai हॅशटॅग वापरा असे आवाहन त्यांनी केले.