कल्याणमधील ‘सुटकेस डेडबाडी’चे गूढ उकलले, तरूणीच्या नराधम बापानेच केली हत्या

8169

कल्याणमधील ‘सुटकेस डेडबाडी’चे गूढ उकलले असून नराधम बापानेच तरुणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटे साडेपाच वाजता कल्याण रेल्वे स्टेशनबाहेर दोघा अज्ञातांनी मुंडके छाटलेला 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह फेकून पळ काढला होता. यानंतर खळबळ उडाली होती.

‘सुटकेस डेडबाडी’ सापडल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि संशयाची सुई तरुणीच्या वडिलांकडे फिरली. पोलिसांनी अधिक तपास केला असता, नराधम बापाने मुलीची घरात हत्या केली. यानंतर तिच्या धडापासून मुंडके वेगळे केले. हे मुंडके टिटवाळ्यात फेकले आणि कंबरेखालचा भाग सुटकेसमध्ये घालून कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर फेकला होता. मुलीचे प्रेमसंबंध मंजूर नसल्याने नराधम बापाने मुलीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

अवघ्या 24 तासांत आरोपी गजाआड
फक्त धडावरून तरुणीची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसममोर होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. अरविंद रमेशचंद्र तिवारी (43) असे आरोपीचे नाव असून त्याचा माग काढला असता तो ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील इंदिरानगरमधील साईनाथनगर चाळीत राहात असल्याचे समजले. सदर आरोपी मालाड येथील पवन हंस लॉजिस्टीकमध्ये कामाला होता. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली असता त्याने हत्या झालेली तरुणी आपली मुलगी असल्याचे कबूल केले. एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने तिची आपण हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोपीने कबूल केले. हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये हे प्रकरण सोडवले आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

त्या दिवशी नक्की काय घडलं?
पहाटे साडेपाच वाजता कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर व्होडाफोन गॅलरीजवळून दोघे अज्ञात तरुण संशयितरित्या काळ्या रंगाची सुटकेस घेऊन जात होते. यावेळी उग्र वास येत असल्याने उपस्थित रिक्षाचालकांनी सुटकेसमध्ये काय आहे, असे विचारताच मारेकरी सुटकेस तिथेच टाकून पळाले. यानंतर रिक्षाचालकांनी लगेचच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाक घेत सुटकेस उघडली असता एका प्लास्टिक पिशवीत मृत महिलेचा कमरेखालचा भाग आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी पंचनामा करून मृत महिलेच्या कमरेखालचा भाग विच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेला.

मृतदेह सुटकेसमध्ये भरून घेऊन येणाऱ्या व्यक्ती कल्याण रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या. काळी सुटकेस घेऊन तोंडाला टॉकेल गुंडाळून मारेकरी फलाट एकमध्ये उतरून स्टेशनच्या बाहेर पडताना फुटेजमध्ये दिसतात. सुटकेस घेतलेल्या व्यक्तीसोबत आणखी दोघे असण्याची शक्यता आहे. हे मारेकरी टिटवाळा स्टेशनमध्ये चढल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या