
सामना प्रतिनिधी । मुंबई
या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा मिळवून देण्याचा निर्धार भारतीय कामगार सेनेने केलेला आहे. यासाठी कामगार सेनेचे हजारो सभासद आज निवडणुकीच्या मैदानात कार्यरत आहेत, असे प्रतिपादन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी केले.
भारतीय कामगार सेनेच्या शेवटच्या कार्यकारिणीची सभा शिवसेना भवनमध्ये झाली. त्यावेळी महाडिक बोलत होते.
देशाला मागे नेणारे 56 पक्षांचे अस्थिर सरकार कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत येता कामा नये. ही भारतीय कामगार सेनेच्या प्रत्येक सभासदाची भावना आहे. देशाला स्थिर, मजबूर सरकार देण्याचे काम युतीच करू शकते. याच भावनेतून हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर, शेतकऱयांच्या प्रश्नावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती केलेली आहे, असे महाडिक यांनी सांगितले.
आता झाले गेले विसरून भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने दिल्लीत संसदेवर भगवा फडकविण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात सतत कार्यरत राहावे. भाजपबरोबरचे कटू संबंध आता मिटलेले आहेत. जुन्या गोष्टी विसरा. जुन्या गोष्टी चघळत बसू नका. आता लोकसभेच्या मैदानातील आपले 48 च्या 48 शिलेदार कसे निवडून येतील याकडे लक्ष द्या, असे आवाहनही महाडिक यांनी यावेळी केले.
यावेळी भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष चाळके, खजिनदार मनोहर साळवी, उपाध्यक्ष मनोहर भिसे यांनीही सभासद, पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले.























































