
लग्नाला घरातून विरोध होत असल्यामुळे एका प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याची घटना कांदिवली पूर्वेकडील समता नगर येथे घडली. आत्महत्या करणारा तरुण 21 तर मुलगी 16 वर्षांची होती. याप्रकरणी समता नगर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
आकाश झाटे (21) असे आत्महत्या करणाऱया प्रियकराचे नाव होते. कांदिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या आदिवासी पाडय़ात तो राहत होता. तसेच तो घरकाम करीत होता. त्याचे त्याच्या लांबच्या नातेवाईक असलेल्या 16 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांना लग्न करायचे होते, परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने लग्नाला घरच्यांचा विरोध होता. परिणामी दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत दोघांनी डोंगरावरून उडी मारून आपले जीवन संपवले. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.































































