
‘संयमाचा महामेरू’ अशी उपाधी मिळालेल्या न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मितभाषी, संयमी, अभ्यासू आणि क्रिकेटच्या जातकुळीला साजेसा सभ्य क्रिकेटपटू असणारा केन आता इंग्लंडच्या कसोटी मालिकेतही खेळणार नाही. प्रतिस्पर्धी खेळाडू असो किंवा चाहते केनने सर्वांची मनं जिंकली होती. 16 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा केन आता मैदानात दिसणार नाही, ही खंत प्रत्येक चाहत्याच्या मनात असेल.
गेल्या काही वर्षांमध्ये टी-20 फ्रँचायझी क्रिकेटमध्ये तो जास्त व्यस्त झाला आणि त्यामुळे तो निवडक आंतरराष्ट्रीय मालिका खेळत होता. सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत अजून दोन सामने बाकी असताना केनने अचानक निवृत्तीचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला.
मी निवृत्तीबाबत बऱयाच काळापासून विचार करत होतो, पण गेल्या काही दिवसांत हे स्पष्ट झाले की, आता निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी माझ्या मनात नेहमीच तीव्र ओढ आणि जिद्द राहिली. न्यूझीलंडसाठी खेळलेल्या प्रत्येक सामन्यात मी माझे सर्वस्व पणाला लावले, याचा मला अभिमान वाटतो. स्वतःच्या अटींवर निवृत्त होता येत असल्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो. हा संघ ज्या दिशेने वाटचाल करत आहे त्याबद्दल मी आशावादी आहे. हा संघ माझ्या अत्यंत जिव्हाळय़ाचा आहे आणि इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत त्याचा भाग राहता आले हे मी माझे मोठे भाग्य समजतो. ते माझ्या हृदयाच्या नेहमीच जवळ राहील, असे केनने निवृत्ती घेताना सांगितले.
केनने 110 कसोटी सामन्यांत 54.06 च्या सरासरीने 9515 धावा केल्या आणि न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 2021 मध्ये हिंदुस्थानीविरुद्ध झालेल्या पहिल्या ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळवून देणे हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण होता. याव्यतिरिक्त त्याने 175 एकदिवसीय सामन्यांत 7256 धावा आणि 93 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 2575 धावा केल्या आहेत.

























































